कोल्हापूर : महायुती सरकारविरोधात सोमवारी दूध उत्पादक शेतकर्यांनी एल्गार पुकारला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. राज्यातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात या संघर्ष मोर्चाने झाली आहे, असा इशारा देत गोकुळ अमूलच्या दावणीला बांधण्यासाठीच सत्ता मिळवण्याकरिता मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी हे षड्यंत्र रचल्याचा घणाघातही आ. पाटील यांनी केला.
बहुमत असूनही अध्यक्ष निवडीसाठी कोरमचे कारण देत, महायुतीने पाच सदस्य नियुक्त करून त्यापैकी चौघांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. या विरोधात समविचारी आघाडीसह जिल्ह्यातील दूध उत्पादकांत संतापाची लाट उसळली. या निर्णयाविरोधात आ. पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली, त्याला जिल्ह्यासह परजिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. दसरा चौकात सकाळी साडेअकरा वाजता आ. सतेज पाटील यांचे आगमन झाले. यावेळी खा. शाहू महाराज, खा. विशाल पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. मालोजीराजे, ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते. आ. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर पावणेबाराच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला.
तत्पूर्वी, संपूर्ण दसरा चौक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आबालवृद्धांसह महिला आणि शेतकऱ्यांच्या गर्दीत अक्षरश: हरवून गेला होता. चौकात सकाळी ११ नंतर उभे राहायलाही जागा शिल्लक नव्हती. चौकाकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर गर्दीचा महापूर आला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सरकारच्या निर्णयाविरोधात संताप होता. रणरणत्या उन्हातही सरकारला धडकी बसावी अशा जोरदार घोषणाबाजी करत, हातात निषेधाचे, सरकारची लक्तरे वेशीवर टांगणारे उपरोधिक फलक आणि काळे झेंडे, डोक्यावर निषेध लिहिलेल्या टोप्यांसह बैलगाडी, म्हशींसह शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यानंतर मोर्चाचे संघर्ष सभेत रूपांतर झाले. यावेळी आ. सतेज पाटील यांनी महायुतीवर सडकून टीका केली.
अदृश्य शक्ती कोण, हे सांगण्याचे मुश्रीफांचे धाडस झाले नाही
गोकुळवर प्रशासक नियुक्त करू नका, अशी विनंती केली होती. मात्र, सूडबुद्धीने प्रशासक नेमला गेला. आपला तेव्हाच डाव ठरला होता, असे सांगत आ. पाटील म्हणाले, त्यानंतर न्यायालयीन लढाईही झाली. त्यावेळी अदृश्य शक्ती कारणीभूत असल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रत्यक्ष निवडणुकीत महायुती झाल्यानंतर मुश्रीफ यांना अदृश्य शक्ती कोण, हे सांगण्याचे धाडस झाले नाही, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला. ‘गोकुळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वैद्यकीय उपचार सुरू असतानाही साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी मी लढलो. माझे काय चुकले होते? आमच्या समविचारी पॅनेलमधील सामान्य उमेदवार निवडून यावेत, यासाठी मी प्रचार केला. तुम्ही मात्र तुमच्या पोराबाळांसाठी लढत होता. सभासदांनी आमचे १३ संचालक निवडून दिले. माझ्याविरोधात तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार होते. तरीही मी एकाकी लढलो. तलवार हातात घेतली की समोरासमोर लढाई लढतो; तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत नाही.’
‘अध्यक्ष निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे कायदेशीर मत आहे. तरीही सरकारकडून सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोप करत आ. पाटील म्हणाले, आमचे १३ संचालक निवडून आले असतानाही मी विरोधी पॅनेलच्या नेत्यांकडे गेलो. गोकुळचे संस्थापकांचे वारसदार शशिकांत पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी तुमचे १२ संचालक उपस्थित ठेवण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी संचालक उपस्थित ठेवले नाहीत. बहुमत असूनही मी पहिले पाऊल टाकले होते, त्यावेळी २८ तारखेला फोन करतो, असा निरोप दिला, पण त्यांनी फोन केला नाही. ‘गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अमूल आणि मदर डेअरी हे दोनच ब्रँड शिल्लक ठेवण्याचा डाव आहे. तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याची अट इतर सहकारी संस्थांवरही नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न असू शकतो.’ लोकशाही मार्गाने सभासदांनी आम्हाला कौल दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात लोकशाही पायदळी तुडवून गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा अध्यादेश काढण्याचे षड्यंत्र हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचेच आहे,’ असा आरोपही पाटील यांनी केला.
खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘गोकुळमध्ये स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देणे अन्यायकारक आहे. या निर्णयाविरोधातील लढ्याला शेवटपर्यंत पाठिंबा राहील. १३ संचालक असलेल्या पॅनेलचाच अध्यक्ष झाला पाहिजे.’ खासदार विशाल पाटील म्हणाले, ‘विनाशकारी आणि विपरीत बुद्धीने शासनाने गोकुळमध्ये निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. सरकारची कार्यपद्धती अशीच राहिली, तर २०२९ पर्यंतही लोकांना वाट पाहावी लागणार नाही.’ खासदार धैर्यशील मोहिते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्यातील सरकार लोकशाहीविरोधी भूमिका घेत आहे. जनतेचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. सरकारची कार्यपद्धती अशीच राहिली, तर जनता त्यांना धोपटून काढेल.’ आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘विरोधी गटातील १२ संचालकांनाही अध्यक्ष निवडीसाठी यायचे आहे. यातील काही संचालकांनी माझ्याशी संपर्क साधून तसा निरोपही दिला आहे. मात्र, त्यांना येऊ दिले जात नाही. ते बैठकीला आले, तर बंटी पाटील यांच्या बाजूने संचालकांची संख्या वाढेल. रेटारेटी करून गोकुळवर सत्ता मिळवली, तर त्याचे वाईट परिणाम होतील, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.’
आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘हुकूमशाही पद्धतीने गोकुळ बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात कोल्हापूरसह राज्यभरातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.’ माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, ‘स्वीकृत संचालकांच्या निवडीचा निर्णय महायुतीचे आमदार शिवाजी पाटील यांनाही पटलेला नाही. निवडणुकीत व्हीआयपी उमेदवार पडल्याने रडीचा डाव खेळला जात आहे.’ विवेकानंद पाटील म्हणाले, ‘तेरा संचालक निवडून आलेले असताना त्यांच्यापैकी एकाला चेअरमन करण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, सरकार स्वीकृत संचालकांच्या माध्यमातून ‘चोरमन’ करण्याचा प्रयत्न करीत आहे. गोकुळच्या निवडणुकीत नेत्यांनी आपल्या पोराबाळांसाठी शपथा घेतल्या. मात्र, २०२९ मध्ये जनतेने शहाणपण दाखवले, तर त्यांचे तोंड काळे होईल.’ यावेळी संजय पवार यांचेही भाषण झाले. माजी आमदार जयंत आसगावकर यांनी स्वागत केले. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहरप्रमुख विराज पाटील, उदय नारकर, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, सरला पाटील, राजेंद्र गड्याण्णावर, गोपाळराव पाटील आदी उपस्थित होते.
मुश्रीफ साहेब, तेव्हा मी जातीवादी वाटलो नाही का?
आ. पाटील म्हणाले, ‘मुश्रीफ साहेब, पंधरा वर्षे माझ्यासोबत सत्तेत राहिलात. माझ्या मांडीला मांडी लावून बसत होता. त्यावेळी मी जातीवादी वाटलो नाही का? मी कधीही जातीयवाद केला नाही. मुश्रीफ यांनी आपला मुलगा पराभूत झाल्याने मी जातीवादी असल्याचा आरोप केला. मातंग समाजाचे सुजित मिणचेकर पडले, मराठा समाजाचे युवराज पाटील यांचा पराभव झाला, यावर मुश्रीफ का बोलत नाहीत?’ असा सवालही त्यांनी केला.
बंटी पाटलांच्या हातानेच दार उघडलं आणि तुम्ही तिथे शिरला
गेली २५-३० वर्षे मी काँग्रेसची धुरा प्रामाणिकपणे सांभाळत आहे. बंटी पाटील कधी सत्तेच्या दारात जाऊन बसला नाही. गोकुळची निवडणूक तुम्ही चार वेळेला लढला, पण तुम्हाला सत्तेचे दार उघडता आले नाही. ते दार फक्त बंटी पाटलांच्या हातानेच उघडले. मी होतो म्हणून तुम्ही तिथे शिरला ते लक्षात ठेवा, असेही पाटील यांनी मुश्रीफ यांना ठणकावले.
अनेक रस्त्यांनाही मोर्चाचेच स्वरूप
मोर्चाचे एक टोक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले, तेव्हा दुसरे टोक दसरा चौकातच होते. मोर्चाच्या प्रमुख मार्गासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या अन्य मार्गांवरूनही लोक येतच होते. यामुळे अनेक रस्त्यांना मोर्चाचेच स्वरूप आले होते.
काळे झेंडे
कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन महायुती सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला. इचलकरंजीतील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी आणलेला भव्य काळ्या रंगाचा निषेध ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. काळ्या झेंड्यांच्या माध्यमातून दूध उत्पादकांनी तीव्र निषेध केला.
याचना नही, अब रण होगा...
सतेज पाटील म्हणाले, आम्ही तुमची कळ काढली नव्हती, तुम्ही आमची कळ काढली, आता समाप्त आम्ही करणार. ‘अब याचना नही, अब रण होगा, फिर कभी जैसे नही होगा.’ शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी सहकाराची पायाभरणी केली, त्यांच्याच पवित्र भूमीत सहकार पायदळी तुडवण्याचे पाप तुम्ही केले.
नेते बैलगाडीतून मोर्चात सहभागी
निषेध मोर्चामध्ये माजी आमदार मालोजीराजे, सत्यजित पाटील, ऋतुराज पाटील बैलगाडीतून सहभागी झाले होते. माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील हे गाडीच्या बॉनेटवर बसून आले होते.
देवश्री पाटील यांचा सहभाग लक्षवेधी
गोकुळच्या निषेध मोर्चात आमदार सतेज पाटील यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, पुतणे माजी आमदार ऋतुराज पाटील सहभागी झाले होते. या संघर्षात सतेज पाटील यांच्या कन्या देवश्री पाटील यांनीही सहभाग नोंदविला. काळ्या रंगाची वेशभूषा परिधान करून त्या महिला आणि युवतींच्या समूहासह सहभाग लक्षवेधी ठरला.