कोल्हापूर, सुनील सकटे : अतिवृष्टीमुळे 23 जुलै 2021 रोजी खचलेल्या पन्हाळा येथील मुख्य रस्त्यास पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. रस्ता दर्जोन्नतीची ही फाईल सध्या मंत्रालयात धूळ खात पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पन्हाळ्यास जाण्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग तयार होणार आहे.
ऐतिहासिक पन्हाळा गडावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीच्या कालावधीत पर्यटकांची संख्या प्रचंड वाढते. एरव्ही हजारो पर्यटकांची मांदियाळी असते. पन्हाळ्याच्या प्रवेशद्वारातच रस्ता खचण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वारंवार घडले आहेत. त्यामुळे रस्ता बंद करण्याची वेळ आली. 23 जुलै 2021 पासून 9 महिने 11 दिवस बंद होता. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. एसटी सेवा ठप्प झाल्याने स्थानिकांना थेट बुधवार पेठेपर्यंत पायी गड उतरण्याची वेळ आली
23 जुलै 2021 पासून रस्ता बंद असल्याने स्थानिक नागरिकांसह प्रशासकीय कार्यालयांतील कर्मचार्यांची कोंडी झाली होती. खचलेला रस्ता सध्या पूर्ववत केला आहे. असे असले, तरी मुख्य रस्ता खचल्यास कायमस्वरूपी पर्यायी रस्ता असावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्ग शोधला आहे.
बुधवार पेठ, लता मंगेशकर बंगला, तीन दरवाजा, बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते पन्हाळा गड असा 2 कि.मी. 500 मीटरचा पर्यायी मार्ग काढला आहे. पन्हाळा ते पावनगड या मार्गावरून रेडे घाटमार्गे हा रस्ता काढण्यात येणार आहे. हा रस्ता सध्या नॉन प्लॅन आहे. त्यामुळे प्रथम या रस्त्याची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. अडीच कि.मी. रस्त्यापैकी 500 मीटर रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो. या अंतरातील मार्गासाठी वन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. याबाबतचा दर्जोन्नती प्रस्ताव 8 डिसेंबर 2022 रोजी अधीक्षक अभियंता कार्यालयातून मुख्य अभियंता कार्यालयास पाठविण्यात आला आहे.
मुख्य अभियंता कार्यालयातून तातडीने हा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविला आहे; मात्र अद्यापही ही फाईल धूळ खात पडून आहे.
वर्षाला 30 ते 35 लाख पर्यटकांची वर्दळ सोमवार ते शुक्रवारदरम्यान 700 ते 800 पर्यटक येतात. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची संख्या 2 हजार ते अडीच हजारांपर्यंत जाते. सुट्टीच्या काळात हा आकडा रोज सुमारे 25 हजारांवर जातो. वार्षिक 30 ते 35 लाख पर्यटक पन्हाळ्यावर हजेरी लावतात.