कोल्हापूर

गृहरक्षक दलात 9 हजार जवानांच्या भरतीचा प्रस्ताव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गृहरक्षक दल अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात रिक्त असलेल्या 9 हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी मंगळवारी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त 200 जागा लवकरच भरण्यात येतील, असेही ते म्हणाले.

गृहरक्षक दलाचे नूतन महासमादेशक तथा अप्पर पोलिस महासंचालक रितेशकुमार मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर होते. गृहरक्षक दलाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा गृहरक्षक दलामार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची देसाई यांनी माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना रितेशकुमार म्हणाले, राज्यात शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी; किंबहुना आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दलाचे जवान रात्र-दिवस कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा, समस्या सोडविण्याच्या द़ृष्टीने गृह खाते सकारात्मक आहे.

गृहरक्षक दलातील जवानांच्या मानधनवाढीबाबतचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे. सध्या प्रतिदिन 670 रुपये मानधन मिळते. त्यात कमाल वाढ करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय होईल, असेही ते म्हणाले. राज्यात गृहरक्षक दलाची 55 हजार पदे मंजूर आहेत. त्यातील रिक्त 9 हजार पदांच्या भरतीबाबतही शासनस्तरावर लवकर निर्णय अपेक्षित आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही रितेशकुमार यांनी सांगितले.

कोल्हापूर गृहरक्षक दलाचे समादेशक अधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह टीमच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यात रिक्त असलेल्या 200 पदांच्या भरतीबाबतही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT