कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने 2025-26 या वर्षी पाठविलेल्या घरफाळा बिलांमध्ये अनेक फ्लॅट मिळकतींवर बिल्डरांची नावे दिसून येत असल्याने फ्लॅटधारकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. ‘आम्ही घर खरेदी केल्यानंतर आमचेच नाव येत होते, मग बिल्डरचे नाव पुन्हा कसे?’ असा प्रश्न अनेक फ्लॅटधारक उपस्थित करत आहेत. परंतु, यामागचं कारण स्पष्ट असून, अशा अनेक फ्लॅटधारकांनी नाव हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. केवळ भोगवटाधारक म्हणूनच त्यांच्या नावाची नोंद आहे.
महापालिकेच्या नियमानुसार मूळ मालकाकडून (बिल्डरकडून) मालमत्ता हस्तांतरण करून घेतल्याशिवाय मिळकत नोंदणी पूर्ण होत नाही. त्यासाठी खरेदीपत्राच्या किमतीच्या 0.1% हस्तांतरण शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरल्यावर चार-पाच दिवसांत नाव हस्तांतरण पूर्ण होते आणि बिल्डरचे नाव वगळून फ्लॅटधारकाचे नाव मिळकतीवर येते.
घरफाळा बिलांमध्ये नाव लागणे किंवा महापालिकेच्या असेसमेंटवर नाव असणे याचा अर्थ मिळकतीची मालकी मिळालेली आहे, असे समजता येत नाही. मालकीसाठी सात-बारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, खरेदीपत्र हीच अधिकृत कागदपत्रे आहेत.