Property card | शहरातील प्रत्येक मिळकतीला आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ pudhari File Photo
कोल्हापूर

Property card | शहरातील प्रत्येक मिळकतीला आता ‘प्रॉपर्टी कार्ड’

महिनाअखेर ड्रोन सर्व्हेला प्रारंभ; राज्यातील पहिलीच महापालिका

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील प्रत्येक मिळकतीचे आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ असेल. याकरिता भारतीय सर्वेक्षण विभागाकडून (सर्व्हे ऑफ इंडिया) संपूर्ण शहर आणि शहरालगत नागरीकरण झालेल्या भागांचा ड्रोन सर्व्हे केला जाणार आहे. त्याला या महिनाअखेर प्रारंभ होणार आहे. संपूर्ण शहराचा सर्व्हे करून सर्व मिळकतींना ‘प्रॉपर्टी कार्ड’ देणारी कोल्हापूर महापालिका राज्यात पहिली ठरणार आहे.

शहरातील 50 हजारांवर मिळकतींचा अद्यापही सात-बारा उतारा निघतो. यामुळे मिळकतधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीतून याकरिता विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, ड्रोन सर्व्हेचे वेळापत्रक 28 मेपासून निश्चित केले आहे.

...अशी असेल प्रक्रिया

1) चार पथकांकडून शहर आणि नागरीकरण झालेल्या भागांचे सर्वेक्षण केले जाईल. त्याद्वारे ‘आर्थो रेक्डिफाईड मॅप’ तयार होईल, त्यानुसार सर्व प्रमाण निश्चित होईल. (20 ते 40 दिवस)

2) खासगी कंपनी मिळकतधारकांच्या घरी जाऊन हद्द निश्चित करेल. (90 ते 120 दिवस)

3) नंतर जागेवर ‘ग्राऊंड पृथिंग’ केले जाईल. त्याद्वारे नकाशे अंतिम करण्यात येतील. (30 दिवस)

4) मालकी चौकशी करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षकांकडून हे काम केले जाईल. (120 दिवस)

5) मालकी चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाईल. (मे 2027)

ड्रोन सर्व्हेची तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे शहरातील सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असून, कोल्हापूरकरांसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. कोल्हापूरसह लगतचा नागरी भाग आणि गावांचेही सर्वेक्षण होईल, भविष्यात तेही फायदेशीर ठरणार आहे.
शिवाजी भोसले, अधीक्षक, भूमिअभिलेख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT