कोल्हापूर : मुलांच्या परीक्षा होऊन उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे पर्यटनासाठी कुटुंबे आता बाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे बसेसना गर्दी होऊ लागली आहे. याचा फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट होऊ लागली आहे. एसटी तिकिटाच्या दीडपट रक्कम आकारण्याची सवलत शासनाने खासगी ट्रॅव्हलसना दिली आहे; परंतु शासनाचा हा निर्णय पायदळी तुडवत प्रवाशांकडून मनमानीपणे तिकिटाचे दर आकारण्यात येऊ लागल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
उन्हाळी सुट्ट्या, विवाह समारंभ यामुळे सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटन केंद्रांवर गर्दी दिसू लागली आहे. एस.टी., रेल्वे बुकिंग फुल्ल आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. त्याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मनमानी पद्धतीने आपल्या बस तिकिटांचे दर वाढवले आहेत. राज्य शासनाने खासगी बस ऑपरेटर्सना महाराष्ट्र एस.टी. भाड्याच्या दीडपटापेक्षा जास्त दर आकारण्यास शासनाने बंदी घातली असतानाही शासनाच्या या निर्णयाला हारताळ फासण्यात येत आहे.
एसटीचे कोल्हापूर ते मुंबई तिकीट 500 रुपये असेल, तर खासगी ट्रॅव्हल्सला 750 रुपये भाडे आकारता येते. मात्र, प्रत्यक्षात अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या शासन निर्णय धाब्यावर बसवत 1,000 ते 1,500 रुपये किंवा त्याहून अधिक भाडे आकारत आहेत. परिणामी, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे आणि मुंबईसारख्या मार्गांवर ही मनमानी अधिक दिसून येते. सीझनच्या काळात प्रवाशांची गरज आणि पर्यायांचा अभाव याचा फायदा घेत या कंपन्या विशेषतः स्लीपर कोच, व्हॉल्व्हो आणि लक्झरी बसच्या दरात आपल्या मनाप्रमाणे वाढ करत आहेत.
शासनाने खासगी बस ऑपरेटर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली जाहीर केली असली, तरी त्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना दरवर्षी आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे मनमानी दर आकारणार्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची तसेच ऑनलाईन बुकिंगवरही नियंत्रण ठेवण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.