Money Lender Case | आजरा तालुक्यात पतसंस्थेतून खासगी सावकारी! 
कोल्हापूर

Money Lender Case | आजरा तालुक्यात पतसंस्थेतून खासगी सावकारी!

करोडो रुपयांचे संशयास्पद व्यवहार : पतसंस्थेच्या पैशातून कारभारीच गिरवतायत खासगी सावकारीचे धडे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील एका पतसंस्थेतूनच खासगी सावकारी चालत असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे या पतसंस्थेचे कारभारीच संस्थेच्या पैशातून खासगी सावकारी चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजरा तालुक्यात एक बहुचर्चित पतसंस्था आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत या संस्थेचा कारभार सहकारातील सगळ्या तत्त्वांना हरताळ फासून सुरू असल्याचे दिसत आहे.

बोलके उदाहरण!

या पतसंस्थेच्या कारभाराचे एक बोलके उदाहरण पुढे आले आहे. कोल्हापूर शहरानजीकच्या एका व्यावसायिकाने या पतसंस्थेकडे व्यावसायिक अडचणीमुळे पाच-पंचवीस लाख रुपयांचे कर्ज मागितले होते. पण कर्जदारावर उदार झालेल्या इथल्या कारभाऱ्यांनी त्या कर्जदाराला चक्क मागणीपेक्षा दुप्पट कर्ज दिले. शिवाय संस्थेच्या एका कारभाऱ्याने हे कर्ज त्याच्या व्यवसायात गुंतविण्याऐवजी सावकारीत गुंतवण्याचा सल्ला दिला. ही गुंतवणूकही तोच कारभारी करून देणार होता. तोंडाला पाणी सुटलेल्या त्या कर्जदाराने कर्जाची रक्कम त्या कारभाऱ्याच्या हवाली केली आणि व्याजाची वाट बघत बसला.

तेल गेलं तूपही गेलं!

कर्जदाराने कारभाऱ्याच्या सल्ल्याने सावकारीत गुंतवलेली रक्कम लवकर वसूल होईना, म्हणून कारभाऱ्याने त्या कर्जदाराला संस्थेतून पुन्हा भले मोठे कर्ज दिले आणि ते कर्जही स्वत:मार्फतच सावकारीत गुंतविले. दुसरीकडे त्या कर्जदाराकडे संस्थेचे कर्ज भरण्यासाठी तगादाही लावला. संबंधित कर्जदाराने काहीतरी उचापती करून संस्थेतून घेतलेल्या कर्जाची दामदुप्पट भरपाई केली. पण या संस्थेच्या कारभाऱ्याने सावकारीत गुंतवलेली रक्कम काही परत त्या कर्जदाराला मिळालीच नाही आणि बिचाऱ्याला देशोधडीला लागावे लागले. याबाबत सहकार विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे.

लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता

या संस्थेच्या बहुतांश कारभाऱ्यांचा संस्थेच्या पैशातून सावकारी करण्याचा धंदाच असल्याचा बोलबाला आहे. एखाद्या कर्जदाराच्या नावावर मागणीपेक्षा जादा कर्ज टाकायचे, वरची रक्कम खासगी सावकारीत गुंतवायची आणि त्या माध्यमातून दाम दसपट कमाई करण्याचा या मंडळींचा गेल्या काही वर्षांतील हा गोरखधंदाच झाला असल्याचे बोलले जात आहे. या संस्थेच्या कारभाऱ्यांनीच सहकाराच्या माध्यमातून पोसलेल्या सावकारीमुळे आजपर्यंत अनेक कर्जदारांचे ‘लाखाचे बारा हजार’ झाले आहेत. त्यामुळे या पतसंस्थेच्या गेल्या काही वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहारांचे सखोल लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT