कौलव : शाहूनगर परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कारखान्याने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने प्रकाश बनकर वर गुणावर विजय मिळवत स्वर्गीय पी.एन.पाटील भोगावती साखर केसरी किताब जिंकला. ५६ मिनिटे चाललेल्या या लढतीत कुस्ती शौकीनानी श्वास रोखून धरला होता. या मैदानात १७० हून अधिक कुस्त्या झाल्या. दुसऱ्या क्रमांकची 'भोगावती कामगार केसरी'ची लढत हणमंत पुरी याने तर तिसऱ्या क्रमांकाची 'भोगावती वाहतूक केसरी'ची लढत श्रीमंत भोसले याने जिंकली.
प्रारंभी आखाडा व प्रतिमा पुजन कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते झाले. पहिल्या क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (सेनादल) आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर ( गंगावेश ) यांच्यात झाली. तब्बल ५६ मिनिटे चाललेल्या या लढतीचा निर्णय शेवटी गुणांवर देण्यात आला. पृथ्वीराजने एकेरी पट काढून बनकरचा ताबा घेत लढत जिंकली.
पंच म्हणून संभाजी वरुटे, बाळू चरापले, भरत कळंत्रे , नामदेव पाडेकर, शंकर मेडसिंगे, सागर चौगले, वसंत लांडगे सुभाष पाटील, संभाजी मगदूम यांनी काम पाहिले तर समालोचन कृष्णात चौगले आणि राजाराम चौगले यांनी केले. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, डी.बी.पाटील, बी.के.डोंगळे, पी.डी. धुंदरे, धैर्यशिल पाटील कौलवकर, रंगराव कळंत्रे, कामगार नेते रावसाहेब पाटील, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप पाटील, शशिकांत पाटील आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .