कोल्हापूर : कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
‘आज दुष्मनों को पता चली सिंदूर की कीमत...’, ‘पाकिस्तानात रात्री 2 वाजता सूर्योदय झाला...’, ‘देशवासीयांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले...’, ‘देशांतर्गत मॉक ड्रीलची चर्चा करून पाकिस्तानात वाजविला सायरन...’, ‘भारतीय सेनेच्या सर्व वीर जवानांच्या शौर्याला सलाम...’ या व अशा अनेक पोस्टस्नी सोशल मीडिया बुधवारी अक्षरश: दुथडी भरून वाहिला.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतातील पहलगामवर हल्ला करून निरपराध पर्यटक व नागरिकांना ठार केले. याचा बदल म्हणून भारताने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. याअंतर्गत बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबादसह पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्थ केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे कंबरडे मोडले. भारताने दिलेल्या या संयमी आणि चोख प्रत्युत्तराचे स्वागत भारतासह जगभरातील लोकांनी आवर्जुन केले. याबाबतच्या विविध प्रकारच्या पोस्टस् बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या.
‘सिंघम’ चित्रपटातील व्हिलनचा प्रसिद्ध डायलॉग ‘चिटींग करता हैं तू...’ या कॅप्शनसह सिंघम (अजय देवगण) व जयकांत शिखरे (प्रकाशराज) यांचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले आहे. ‘साला मॉक ड्रील बोलकर रियल अॅटक कर दिया...’ अशा वाक्यांसह त्याला साजेशा पाकिस्तानी समर्थकाचे छायाचित्र प्रचंड व्हायरल झाले आहे.
भारतीय सैन्यदलाने अत्यंत नियंत्रित; पण परिणामकारक हल्ले करून अतिरेक्यांना योग्य तो धडा दिला यासाठी लष्कराचे अभिनंदन! पाकिस्तानातील सामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यावर हल्ले केलेले नाहीत असे लष्करानं स्पष्ट केलं आहे. दोषींना सोडायचं नाही आणि निरपराधांना मारायचं नाही ही भारतीय परंपरा आपल्या लष्करानं कायम राखली ही अभिमानास्पद बाब आहे. सैन्यदलाचं आणि सैन्यदलाला मोकळीक देणार्या भारत सरकारचं अभिनंदन!
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धाचीही चर्चा रंगली आहे. यामुळे 1971 - आयर्न लेडी (इंदिरा गांधी) आणि 2025 - सायरन मॅन (नरेंद्र मोदी) अशा पोस्ट्सही व्हारल होत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या इतिहासातील दाखले देत शिवछत्रपती व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या गनिमी कावा युद्ध नितीबद्दल अभिमान व्यक्त करणार्या पोस्टही मोठ्या प्रमाणांत व्हायरल झाल्या आहेत. शिवछत्रपती-शंभूराजे यांच्याप्रमाणे घुसून मारणे ही आता भारतीयांना सवय झाली आहे. यामुळे आता शांत बसणार नाही असा सज्जड दम देणार्या पोस्टही शिवछत्रपती- शंभूराजे यांच्या चित्रांसह व्हायरल करण्यात आल्या आहेत.