कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती कॉलेज कॅम्पस् परिसरात युवतींची टिंगलटवाळी, छेडछाड, हुल्लडबाजी करणार्या 60 टपोर्यांवर शाहूपुरी पोलिस आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 369 वाहनधारकांवर 4 लाख 17 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सकाळी 9 ते 11 या काळात राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे हुल्लडबाजांसह कॉलेज कॅम्पस् परिसरात घुटमळणार्यांची पाचावर धारण बसली.
शहरातील मध्यवर्ती कॉलेज कॅम्पस् परिसरात युवतींची छेडछाड, टिंगलटवाळीसह छेडछाडीचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हे अन्वेषण पथकांना एकाचवेळी कारवाईचे निर्देश दिले होते. शाहूपुरी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सकाळी 9 ते 11 या काळात शहरातील 7 महाविद्यालय परिसरात मोहीम राबविली.
टिंगलटवाळी, छेडछाड करणार्या 60 टपोर्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई केली. याशिवाय लायसेन्स न काढणे (31), अल्पवयीन चालक (1) तिब्बल सीट (36), मोबाईलवर बोलणे (33), नो पार्किंग व रहदारीला अडथळा (32), कर्कश हार्न (5), लायसेन्स जवळ न बाळगणे (150), पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन (44), फॅन्सी नंबर फ्लेट (32) एल बोर्ड न लावणे (5) अशा एकूण 369 वाहनधारकांवर 4 लाख 17 हजार 750 रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके, शहर वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे यांनी सांगितले.