President Draupadi Murmu's visit postponed
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Pudhari File Photo
कोल्हापूर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा पुढे ढकलला : आमदार कोरे

पुढारी वृत्तसेवा

वारणानगर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा रविवारी (दि. 28) होणारा वारणानगर दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी शुक्रवारी रात्री दिली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांवर महापुराचे संकट आले असून, जिल्ह्यातील अनेक गावांत पाणी शिरले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. याचा प्रशासनावर ताण असून, संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

राष्ट्रपतींच्या सुरक्षा व इतर कारणांमुळे प्रशासनाची तारेवरची कसरत होणार असल्याने याचा आढावा या दौर्‍याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने घेतला याबाबत दिवसभर बैठका सुरू होत्या. तसा अहवाल राष्ट्रपती भवनला प्राप्त झाल्यानंतर तेथून अधिकृत दौरा रद्द झाल्याचा साडेसातच्या सुमारास निरोप आल्याची माहिती आमदार कोरे यांनी दिली. तसेच 3 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा दौरा होणार असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले.

वारणा समूहातील महिला सबलीकरणास 50 वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने भव्य महिला मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास राष्ट्रपती मुर्मू संबोधित करणार होत्या. तसेच विविध संस्थांना भेटी देणार होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या दौर्‍याची गेल्या पाच-सहा दिवसांपासून संततधार पावसात जय्यत तयारी सुरू आहे. मंडप व व्यासपीठ उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तसेच प्रशासनही कामाला लागले होते.

SCROLL FOR NEXT