कोल्हापूर

kolhapur | शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून अखंड प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करून देशाच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन-संवर्धन-संरक्षणाचे कार्य कोल्हापूरकरांनी अखंड राखले आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून शतकोत्तर कार्याचा वारसा इथे आजही जपला जात आहे.

शिवछत्रपतींचा रथोत्सव

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेच्या दुसर्‍या दिवशी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई रथोत्सवाची परंपरा आहे. याला जोडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी तिसर्‍या दिवशी शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणींच्या रथोत्सवाची सुरुवात केली (इसवी सन 1914). रथोत्सवासाठी साकारण्यात आलेली शिवरायांची सोन्याची सुबक मूर्ती आजही पाहायला मिळते. जोतिबा यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना शिवछत्रपती व ताराराणींच्या इतिहासाची माहिती मिळावी, हा या मागचा उद्देश होता.

शिवछत्रपतींची स्मृती मंदिरे

राजर्षी शाहू महाराज यांनी भावी पिढीला शिवछत्रपतींचे अखंड स्मरण राहावे, या उद्देशाने कोल्हापुरातील नर्सरी बाग, जुना राजवाडा आणि पन्हाळगडावर शिवछत्रपतींची स्मृती मंदिरे उभारली. सिंधुदुर्ग येथे शिवपुत्र छ. राजाराम महाराज यांनी उभारलेल्या शिवमंदिरासमोर भव्य सभामंडप बांधला. आजही हा सभामंडप दिमाखात उभा आहे. या मंदिराला करवीर छत्रपतींच्या वतीने वस्ते, जिरेटोप, पालखी, अब्दागिर्‍या, चवर्‍या देण्यासह नियमित पूजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतचा संदर्भ सन 1919 च्या कागदपत्रात आहेत.

शिवचरित्र, चांदीच्या हातासाठी आर्थिक मदत

शिवचरित्र लेखनासाठी आर्थिक मदत म्हणून दत्तात्रय बळवंत पारसनीस यांना 6 हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. (दि. 23-4-1904). तसेच सिंधुदुर्ग येथील तटबंदीवर असणार्‍या शिवछत्रपतींच्या हाताच्या ठशाची चांदीची प्रतिकृती तयार करण्यासाठी 3 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. (दि. 27 -6-1916).

शिवजयंतीसाठी विविध उपाययोजना

राजर्षी शाहू काळापासून कोल्हापुरात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नर्सरी बागेतील शिवमंदिरासमोरील उत्सवासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राजर्षींनी घेतले होते. शिवमंदिराच्या उत्सवात तोफा वाजविण्यास परवानगी देण्यात आली होती. करवीर छत्रपतींनी शिवजयंती, शिवपुण्यतीथी आणि ताराराणी पुण्यतिथीला सार्वजनिक सुट्टीचा आदेश दिला होता. (दि. 31 - 1 - 1916). पन्हाळगडावरील शिवमंदिरसमोर नगारा वाजविणारे नोकरी गुलमहमद नगारजी यांना जमीन इनाम देण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT