कोल्हापूर : इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शाहू चरित्रामुळे त्यांचा सामाजिक विचार जगभर पोहोचला. शाहूंचे विचार जपणे हीच डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज यांनी केले. नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी झालेल्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
शाहू महाराज म्हणाले, डॉ. पवार यांनी शिवछत्रपती, रणरागिणी ताराराणी यांच्यासह मराठा साम—ाज्यातील अनेक दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वांवर संशोधन केले. राजर्षी शाहूंचे चरित्र देश-विदेशातील विविध भाषांमध्ये जगभर पोहोचले. डॉ. पवार यांचे अपूर्ण राहिलेले शिवचरित्र त्यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पूर्ण करतील. प्रा. मधुकर पाटील यांनी, डॉ.पवार यांच्या नावाने पुरस्कार व संस्था स्थापन करण्याची मागणी केली. डॉ. सुनील पाटील यांनी, त्यांच्या नावे तरुण इतिहास अभ्यासकांसाठी पुरस्कार सुरू करावेत, असे सांगितले. शाहीर दिलीप सावंत म्हणाले, डॉ. पवार यांनी शाहीर परिषदेला पाठबळ दिले. शिवसेनेचे विजय देवणे यांनी सातारा येथील ताराराणींच्या समाधिस्थळाचा शोध डॉ. पवार यांच्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. महापौर रूपाराणी निकम यांनी, इतिहास संशोधनातून जनजागृती केल्याचे सांगितले.
इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी पवार यांच्याशी असलेल्या 50 वर्षांच्या संबंधांची आठवण सांगितली. इंद्रजित सावंत यांनी, इतिहासाचे शुद्धीकरण आणि सत्य मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती, असे नमूद केले. आ. जयंत आसगावकर, डॉ. अशोक चौसाळकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य टी. एस. पाटील, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, वसंतराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, दिलीप पवार, चंद्रकांत चव्हाण, डॉ. रूपा शहा, डॉ. सीमा पाटील, भरत रसाळे, कादर मलबारी, हसन देसाई, नगरसेवक आदिल फरास, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, प्रा. किसन कुराडे, शिवाजीराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. अरुंधती पवार, पृथ्वीराज पवार, बाळ पाटणकर, पै. बाबा महाडिक, शिवाजी पाटील, आर. के. पोवार, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आदी उपस्थित होते.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा मोठा आधार
डॉ. पवार यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, बाबांवर हॉस्पिटलमध्ये दीड महिना सुरू असणार्या उपचारावेळी अनेकांनी मनोधर्य वाढवले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, खा. शाहू महाराज, व्ही.बी. पाटील हे पहाडासारखे कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले. पंडित कंदले म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव, खा. शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी यांच्यामुळे डॉ. पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
राजर्षी शाहू पुरस्कारासह विविध सूचना
मान्यवरांनी डॉ. पवार यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अभ्यासिका करणे, पुतळा उभारणे, महापालिकेत ग्रंथालय निर्मिती, पुरस्कार देणे, संशोधन संस्था उभारणे यासह शासनाने त्यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार द्यावा, अशा विविध सूचना मान्यवरांनी मांडल्या. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी समितीसाठी 1 लाखाच्या निधीची घोषणा केली.