कोल्हापूर : महापालिकेची विद्यमान प्रशासकीय इमारत अपुरी पडत असल्याने शेंडा पार्क येथे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबाबत नियोजन करा. नवीन प्रशासकीय इमारतीचे आराखडे व अंदाजपत्रक तातडीने सादर करा, असे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शहर अभियंता रमेश मस्कर यांना सोमवारी (दि. ८) दिले.
आयुक्त डॉ. भारूड यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांची पाहणी करून कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, विभागनिहाय कामकाजाची कार्यपद्धती तसेच उपलब्ध सुविधांची माहिती संबंधित विभागप्रमुखांकडून घेतली. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त कार्यालय, उपायुक्त कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, रुग्ण व कल्याण विभाग, आस्थापना विभाग, मुख्य लेखापरीक्षक कार्यालय, रेकॉर्ड विभाग, डेटा सेंटर, नगरसचिव विभाग, पीडब्ल्यूडी अकाऊंट विभाग,शहर अभियंता कार्यालय, प्रकल्प विभाग, लेखा विभाग, नगदी विभाग, नागरी सुविधा केंद्र, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग तसेच जन्म-मृत्यू नोंदणी विभागाची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.