Jyotiba Chaitra Yatra | जोतिबा चैत्र यात्रेची तयारी पूर्ण; यात्रेवर 120 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर  
कोल्हापूर

Jyotiba Chaitra Yatra | जोतिबा चैत्र यात्रेची तयारी पूर्ण; यात्रेवर 120 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

जिल्हा प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मंदिर परिसरात बांधलेल्या नव्या दर्शन मंडपातून भाविकांसाठी दर्शन रांग करण्यात आली आहे. यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. संपूर्ण यात्राकाळात 120 हून अधिक कॅमेर्‍यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पार्किंग व्यवस्था 34 ठिकाणी

जोतिबा डोंगर परिसरात तब्बल 34 हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. 24 तास वाहतूक पोलिसही तैनात असणार आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळली जाईल, असे पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले.

स्वतंत्र वाहनतळ, दर्शनासाठी स्क्रीन

सासनकाठीधारकांना स्वतंत्र वाहनतळ तयार केले आहे. त्यात पाण्यासह इतर सुविधा आहेत. आरोग्य, पाणी, स्वच्छता सेवा पुरवण्यात येत आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. स्क्रीनद्वारे श्री जोतिबा देवाचे लाईव्ह दर्शन होणार आहे.

सुरक्षेच्या द़ृष्टीने नेटके नियोजन

प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने नेटके नियोजन केले आहे. यात्राकाळात वीज खंडित झाल्यास मोठ्या जनरेटर्सची सोय केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, बॉम्ब शोध व नाशक पथक, अग्निशमन दलाची व्यवस्था केली आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अन्य जिल्ह्यांतूनही बंदोबस्त मागवला आहे. पोलिस अधीक्षक 1, अपर अधीक्षक 7, उपअधीक्षक, निरीक्षक 25, उपनिरीक्षक 70, महिला पोलिस, वाहतूक पोलिस, शीघ— कृती दल, आरसीपी, होमगार्ड, एसआरपी असे दोन हजारांवर पोलिस, वाहतूक पोलिस तैनात असणार आहेत.

प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी

चैत्र यात्रा प्लास्टिक बंदीसाठी यशस्वी झाली असून व्यापारी, दुकानदार यांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत प्लास्टिक पिशवी वापरास बंद केल्या असून, पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर केलेला दिसून आला आहे.

गायमुखावरील अन्नछत्र सुरू

सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी त्याचा लाभ घेतला. जेवणाबरोबर चहाची सोय करण्यात आली आहे. बैलांसाठी पेंड वाटप करण्यात आली आहे. हे अन्नछत्र दि. 3 पर्यंत सुरू राहणार आहे. अन्नछत्रासाठी 400 हून अधिक स्वयंसेवक सेवा देत आहेत.

बुधवारी होणारे धार्मिक कार्यक्रम

पहाटे 4 ते 5 : श्रींची पाद्यपूजा, काकडआरती व मुखमार्जन, पहाटे 5 ते 6 : पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते श्रींना शासकीय महाभिषेक, सकाळी 7 : श्रींची महापूजा. सकाळी 10 ते दुपारी 12 : धुपारती सोहळा व अंगारा वाटप. श्रींच्या मंदिरात दुपारी 1 वाजता सासनकाठ्यांची भव्य मिरवणूक. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेची सलामी देऊन श्रींचा मुख्य पालखी सोहळा व मिरवणूक, रात्री 8 वाजता यमाई मंदिरात धार्मिक विधी व आतषबाजी, पालखी सोहळा. त्यानंतर लवाजमा जोतिबा मंदिराकडे परत येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT