कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कोल्हापूर खंडपीठात लवकरच रूपांतर होणार आहे. त्याची राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. या खंडपीठाच्या नव्या इमारतीसह न्यायमूर्तींच्या निवासस्थान बांधकामासाठी यापूर्वीच्या लेखाशीर्षात (निधी विनियोगासाठी हेड) सुधारणा केली आहे. त्याबाबतचा आदेश विधी व न्याय विभागाने काढला आहे.
विधी व न्याय विभागांतर्गंत कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे व न्यायालयांना पायाभूत सुविधा पुरविणे, अशी राज्य योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वांद्रे (मुंबई) येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (हायकोर्ट) इमारतीसाठी 12 जून 2025 रोजी नवीन लेखाशीर्ष निर्माण केले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचला मंजुरी देण्यात आली. यानंतर या बेंचचे प्रत्यक्ष कामकाजही 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापुरात सुरू झाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे, अशी मागणी होती; मात्र पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी सर्किट बेंच मंजूर करण्यात आले. या सर्किट बेंचचे टप्प्याटप्प्याने खंडपीठात रूपांतर केले जाणार आहे. त्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. त्याकरीता उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथील नव्या इमारतीसाठी ‘कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे व न्यायालयांना पायाभूत सुविधा पुरविणे’ या राज्य योजनेसाठी काढलेल्या लेखाशीर्षात सुधारणा केली आहे.
याबाबत काढलेल्या आदेशात राज्य शासनाने कोल्हापूर सर्किट बेंचचे भविष्यात खंडपीठात रूपांतर होणार आहे. या खंडपीठासाठी नवीन इमारतीचे बांधकाम अपेक्षित आहे. या बांधकामासाठी तसेच न्यायमूर्तींच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी तरतुदी करता येण्यासाठी या लेखाशीर्षात सुधारणा केल्याचेही म्हटले आहे.
शेंडा पार्कात होणार खंडपीठ
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ शेंडा पार्क येथील जागेत उभारले जाणार आहे. याकरीता बांधकाम आराखडा तयार करण्याचीही प्रक्रिया राज्य शासनाच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. त्यात आता राज्य शासनाने बांधकामाबाबत सुधारित आदेश काढला असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसह कोल्हापूरच्या खंडपीठाच्या इमारतीलाही वेग येईल, अशी शक्यता आहे.