चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कायम निवडणुकीत व्यस्त असणारे नेते आता महापालिका निवडणुकातून मोकळे होण्यापूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीत आहेत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीने यामध्ये तयारीत आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाने यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. सुमारे तीनशेवर अर्जांची विक्री झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवार व रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या दोन्ही पक्षांची तयारी पाहता महायुती व महाविकास आघाडी होण्याची शक्यता तूर्त तरी धूसर असून युती आघाडीतील दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे नगरपालिकेत स्वबळ, महापालिकेत महायुती व एखाद्या पक्षाला वगळून आघाडी तर काही ठिकाणी युती अधिक मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याच्या तयारीत हे पक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळेल.
यापूर्वीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेत सुरुवातीची अडीच वर्षे भाजपकडे अध्यक्षपद तर उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसकडे अध्यक्षपद राहिले होते. अशा विचित्र राजकीय परिस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. आताच्या राजकीय परिस्थितीतही फरक पडला आहे. यापूर्वी या निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादी व शिवसेना एकसंध होती. या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. जिल्ह्यात सत्तेचे बलाबलही बदलले आहे. विधानसभेचे सर्वच्या सर्व दहाही आमदार महायुतीचे आहेत, तर दोन खासदारही त्यांच्याकडे आहेत. काँग्रेसकडे एकमेव खासदार व विधान परिषदेचे दोन आमदार असे संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत ही लढाई होत आहे.
यापूर्वी दि. 23 फेब—ुवारी 2017 रोजी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. यामध्ये पहिल्या अडीच वर्षांतच भाजपकडे अध्यक्षपद आले. जिल्हा परिषदेच्या 55 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले. 37 विरुद्ध 28 मतांनी ही निवडणूक झाली.
भाजप आघाडीकडे भाजपचे 14, शिवसेना 7, जनसुराज्य शक्ती पक्षाचे 6, ताराराणी आघाडीचे 3, हत्तरकी व आवाडे गटाचे प्रत्येकी 2, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2, अपक्ष 1 असे बलाबल होते. (शिवसेनेत नरके गटाचे 2, सरूडकर गटाचे 2, मिणचेकर व संजय घाटगे गटाचे प्रत्येकी एक अशी सदस्य संख्या होती.) तर काँग्रेस आघाडीकडे काँग्रेस 13, राष्ट्रवादी 10, शाहू आघाडी 2, आबिटकर गट, उल्हास पाटील गट व प्रा. संजय मंडलिक गट 1 अशी सदस्यसंख्या होती.
भाजप-शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेत येऊनही त्यांना ती टिकविता आली नाही. दि. 1 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील हे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील हे उपाध्यक्षपदी निवडून आले. भाजप-शिवसेनेपेक्षाही जास्त मताधिक्य घेऊन हे सत्तांतर घडविण्यात सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली. यामध्ये शिवसेनेची साथ मोलाची ठरली, 41 विरुद्ध 24 मतांनी हे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आले. शिवसेनेने पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडी सत्तेत आली होतीच, पण त्याचबरोबर भाजप आघाडीची 12 मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले.
सत्तांतरात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने 41 मते मिळाली. यामध्ये काँग्रेस 14, राष्ट्रवादी 10, शिवसेना 10, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2, शाहू आघाडी 2, चंदगड तसेच अपक्ष, ताराराणी आघाडी प्रत्येकी 1 अशी मते मिळाली. तर विरोधात 24 मते मिळाली होती. त्यामध्ये भाजप 13, जनसुराज्य शक्ती 6, ताराराणी आघाडी व आवाडे गट 2 व चंदगड आघाडी 1 अशी मते मिळाली. यानंतर 12 जुलै 2021 रोजी ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील-सडोलीकर यांचे चिरंजीव राहुल पाटील यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी हे उपाध्यक्षपदी निवडून आले. या निवडी बिनविरोध झाल्या. 2022 मध्ये सभागृहाची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर ते विसर्जित करण्यात आल्यानंतर आता या निवडणुका होत आहेत..
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार होणार म्हणून गाजत असतानाच त्या पुढे गेल्या. 2017 नंतर प्रथमच या निवडणुका होत आहेत. पाच वर्षांनंतर कालखंडानंतर नियमानुसार न झालेल्या निवडणुकांमुळे मधल्या काळात नेतृत्वाची दुसरी पिढी तयार झाली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.
अर्ज विक्री करण्यात काँग्रेस पक्षाने पहिले पाऊल उचलले आहे. त्यांची अर्ज विक्री सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यापुढे पाऊल टाकत येत्या शनिवारी व रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे जाहीर केले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी म्हणून लढणार का, हे पाहावे लागेल. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आघाडी बिघडली असून शरद पवार राष्ट्रवादीने तिसरी आघाडी स्थापन केली आहे, तर महायुतीच्या घटक पक्षात कोल्हापूर महापालिकेत जागवाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. तालुक्या-तालुक्यांतील नेत्यांचे एकमत होणे अवघड असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती करून निवडणुकीनंतर युती आणि आघाडी म्हणून एकत्र येण्याच्या फॉर्म्युला अमलात येऊ शकतो.