बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील कोलिक येथील सोनाली नागेश कांबळे या गर्भवतीस कासारी नदीच्या पुराच्या पाण्यातून बोटीच्या साहाय्याने सुखरूप बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आले. कळे पोलीस ठाणे व आपत्ती व्यवस्थापन कर्मचार्यांच्या तत्परतेमुळे वेळेत उपचार मिळाल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सोनाली यांना किसरूळ येथे माहेरी असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, पोर्ले बंधार्यानजीक पडसाळी रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दवाखान्यात कसे पोहोचवायचे, याची चिंता कुटुंबीयांना सतावत असतानाच ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन बोटीच्या साहाय्याने पूरग्रस्त मार्ग ओलांडून त्या महिलेला सुरक्षितपणे दवाखान्यात हलवले. तिथे तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या कार्यात मंडल अधिकारी नलिनी मोहिते, ग्राम महसूल अधिकारी म्हसवेकर, चौगले, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण, आरोग्य साहायक सारिका पाटील, आशा स्वयंसेविका सुवर्णा मुगडे व सीमा भवड, पोलीस पाटील विक्रम पाटील, सुभाष सावंत यांच्यासह आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सहभागी झाले होते.