कोल्हापूर : दहा लाखांच्या हुंड्याची मागणी करून गर्भवती पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रोहित अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी, ता. करवीर) याच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सिद्धी रोहित दुधाणे ( वय 26, रा. वरणगे-पाडळी, सध्या रा. कबनूर, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयितास लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.
तुझ्या आई-वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही. त्यामुळे त्याच्याकडून 10 लाख रुपये आणून दे, या मागणीसाठी सतत तगादा लावून वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ, जाचहाट करून नवर्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ऑक्टोबर 2024 ते दि. 2 जून 2025 याकाळात हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.