कोल्हापूर : डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणजे सर्व पक्षीयांचा एकमेव आधारवड, अशा शब्दांत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोहोळ यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची निवासस्थानी भेट घेऊन 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मोहोळ यांनी डॉ. जाधव यांची नागाळा पार्क येथील निवासस्थानी भेट घेतली. डॉ. जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी द्यावा, अशी विनंती डॉ. जाधव यांनी मोहोळ यांना केली. यावेळी सीमाप्रश्न, अंबाबाई मंदिरातील दलित प्रवेश आदींसह कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी मोहोळ यांनी कोल्हापुरातील आठवणींना उजाळा देत पेपर म्हणजे ‘पुढारी’ हे आजही आपल्या मनावर ठसलेले असल्याचे सांगितले.
यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, यश पाटील, राजवीर जाधव, तेजराज जाधव, ऋतुराज पाटील, विनायक पाचलग आदींसह भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, युवा मोर्चाचे अध्यक्ष विश्वजित पवार, मारुती माने, सागर लालवाणी, विराज चिखलीकर, भूषण काणकेकर, सुमित पारखे, जयेश घरपनकर आदी उपस्थित होते.