कोल्हापूर ः जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे ‘पुढारी’ जाऊन पोहोचतो. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात दैनिक ‘पुढारी’ अग्रेसर असतो. म्हणूनच सामान्य जनतेच्या मनात ‘पुढारी’ने ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ‘पुढारी’चे योगदान अविस्मरणीय आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांच्या अंतःकरणात ‘पुढारी’चे स्थान कोरले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले.
दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव हे वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ व त्यांनी आपल्या पाच तपांचा प्रदीर्घ पत्रकारितेचा लेखा-जोखा मांडलेले ‘सिंहायन’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. 5) पोलिस मुख्यालयामधील मैदानावर झाला. त्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले.
हा आगळावेगळा सोहळा असल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘यापूर्वी कोल्हापुरात मी एक सोहळा बघितला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा गौरव झाला होता. त्यावेळी चव्हाण यांनी कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती आणि वि. स. खांडेकर यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भावना पाहून मी पंचगंगेला अनेकदा पूर येतो हे पाहिले आहे, पण आज सत्काराच्या निमित्ताने लोकगंगेचा महापूर आल्याचे उद्गार काढले होते. तेच चित्र डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याबाबतीत आज बघायला मिळत आहे, असे म्हणत पवार यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
‘पुढारी’ ही एक संस्था आहे. गेली अनेक वर्षे ‘पुढारी’ने कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये मोलाची भूमिका घेतली आहे. मी सुद्धा माझ्या सुरुवातीच्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला कोल्हापुरात येत होतो, त्या त्या वेळेला ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्याकडे जात होतो. त्यांचे विचार ऐकत होतो. त्यांच्या लेखाबद्दल चर्चा करत होतो. याचा आगळावेगळा आनंद मला घेता आला. डॉ. ग. गो. जाधव एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते, असे उद्गार पवार यांनी काढले.
सत्यशोधक चळवळ हा महाराष्ट्राचा बलदंड विचार होता. महात्मा फुले, माधवराव बागल यांच्यासह अनेकांनी या चळवळीला एकप्रकारची शक्ती दिली. ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांनी ही चळवळ आणि सत्यशोधक विचार खेड्यापाड्यात नेऊन ऐतिहासिक कामगिरी केली. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात हे महत्त्वाचे काम आहे. गेली 50 ते 60 वर्षे त्यांच्या विचाराची परंपरा त्यांची पुढची पिढी घेऊन जात आहे, असेही पवार म्हणाले.
‘पुढारी’ची सुरुवात कोल्हापुरात झाली असली तरी डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांनी त्याचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात केला. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह राज्याच्या कानाकोपर्यांत सर्वत्र ‘पुढारी’ वाचायला मिळतो. ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांचा विचार जतन करण्यासाठी जे जे शक्य आहे, ते ते डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. योगेश जाधव करत आहेत, असे पवार म्हणाले.
सियाचीनला भेट देणारा मी पहिला संरक्षणमंत्री होतो, असे सांगून पवार म्हणाले, तब्बल वीस हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीनमध्ये मायनस 20 डिग्री सेल्सियस तापमान असते. एक फर्लांगभर चालायला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो. भारतीय जवानांना अतिशय यातना सहन कराव्या लागतात. पायाची बोटे कुजतात. अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा नसेल तर जवानांनाही राहणे कठीण होते. हे दुःख ‘पुढारी’ने ओळखले. ‘पुढारी’ने सियाचीनमध्ये भारतीय जवानांसाठी हॉस्पिटल उभारले ही अभिमानाची गोष्ट आहे. सध्या तेथील जवानांना वैद्यकीय सेवा घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. ‘पुढारी’कारांचे हे कर्तृत्व सैन्य दलाला माहिती आहे.