कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ने अनेक सामाजिक चळवळीत योगदान दिले आहे. अनेक वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. दै. ‘पुढारी’ मुळेच आम्ही पुढारी झालो, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दै. ‘पुढारी’चा गौरव केला.
माझे जुने मित्र शरद पवार आणि नवीन मित्र देवेंद्र फडणीस असा उल्लेख मंत्री आठवले यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. खा. शरद पवार यांना उद्देशून बोलताना मंत्री आठवले म्हणाले, शिर्डीमध्ये पराभवानंतर तुम्ही मला राज्यसभेवर येण्याची संधी दिली; मात्र होकार दिला असता, तर तुमच्यासोबत राहावे लागले असते. मंत्री झालो नसतो. केवळ राज्यसभेवर राहिलो असतो. तुम्ही मला मंत्री केले नाही. नरेंद्र मोदींसोबत गेलो आणि मंत्रीही झालो. मंत्री आठवले म्हणाले, वसंत कांबळे-लिंगनूरकर यांनी घेतलेली 2006 मध्ये माझी मुलाखत दै. ‘पुढारी’तून छापली.
त्यावेळी ओबीसी आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहीजे अशी भुमिका मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकीर्दीत राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. फडणवीस सरकारने आता हैद्राबाद गॅझेटला मान्यता दिली आहे. मराठा समाजास न्याय मिळाला पाहीजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत.
मी ज्यांचा होतो मित्र त्यांच भले होते असे आहे चित्र, मी पवार साहेबांचा मित्र होते. राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मित्र होतो आता देवेंद्र फडणवीस यांचा मित्र आहे. मी दहा वर्षे पंढरपुरचा तर पाच वर्षे मुंबईचा खासदार होतो. प्रतापसिंह जाधव आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हीही आमच्यासोबत राहीले पाहीजे. तुम्ही जास्त जगांव आणि केद्रात आमची सत्ता येत राहो, मी असाच केंद्रात मंत्री होत राहीन. तोपर्यंत नरेंद्र मोदी आमचे मित्र आहेत असे ते म्हणाले. आपण कुठल्याही पक्षात असो महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करायचे आहेत. सर्वानी मिळुन कोल्हापुरचा कायापालट करुया. संविधान कोणी बदलू शकत नाही. मात्र संविधान बदलणाऱ्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. असेही मंत्री आठवले म्हणाले.
प्रतापरावांनी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केली ऐशी की तैशी, म्हणूनच तुम्ही पुरी केली वर्षे ऐंशी, लोक तुम्हाला विचारतात तुमची तब्बेत आहे कैसी, तुम्ही सांगता म्हणून तर वर्ष पुर्ण केली वर्षे ऐंशी, तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव, म्हणूनच महाराष्ट्रात गाजतेय तुमचे नाव. माझ्या पाठीशी अनेक वेळा उभा राहीला पुढारी, म्हणून तर मी आवर्जुन केली पंढरीची वारी, आपण सर्व पक्षाच्या नेत्यांना केले एकत्र, मी तुम्हाला देणार आहे अभिनंदन पत्र. या कवितेने उपस्थितांना हसू आवरता आले नाही.
आठवलेंचे भाषण अन् सभागृहात चैतन्य
मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खुमासदार भाषणाची सुरुवात कवितेच्या माध्यमातून केली. यावेळी त्यांनी खा. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत संदर्भाने मिश्कीलपणे मांडणी केल्याने सभागृहात चैतन्य निर्माण झाले.