‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पत्रकारितेतील भीष्माचार्य, माझे वडील, डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात देशात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्यांची कारकीर्द म्हणजे एक जिद्दी, धाडसी आणि ध्येयवादी संपादकाची जीवनगाथा आहे. जाधव साहेब हे पत्रकारितेतील विद्यापीठ आहेत. त्यांनी आदर्श पत्रकारिता काय असते, हे दाखवून दिले. पत्रकारिता करताना समाजाला कशी दिशा द्यायची, याचाही वस्तुपाठ घालून दिला. आज माझ्यासमोर जो जनसागर आहे, त्यातल्या अनेक माणसांच्या जीवनात साहेबांमुळे काही ना काही पॉझिटिव्ह बदल झालेला आहे. हे सगळं नक्की कसं घडलं, त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवे. त्यांच्या कामाची प्रेरणा पुढच्या पिढीला मिळायला हवी. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
डॉ. जाधव म्हणाले, आपलं वर्तमानपत्र जागतिक दर्जाचं करायचं, तर त्यासाठी उत्तम टेक्नॉलॉजी हवी हे ओळखून त्यांनी 70 च्या दशकातच परदेशातून प्रिटींग मशिन आणलं. जवळपास 20 वर्षांपूर्वी स्वतः रेडिओ स्टेशन काढले. आता व्हिडीओ हेच भविष्य असणार, हे ओळखून स्वतःचं टी. व्ही. चॅनेल उभा केले. त्यांच्या याच व्हिजनमुळे एकेकाळी जिल्हा वृत्तपत्र असणारा ‘पुढारी’ आज राज्यातील नव्हे, तर देशातील मोठा ब्रँड झाला आहे. ‘पुढारी’च्या 24 हून अधिक एडिशन आहेत. प्रिंट, रेडिओ, टीव्ही, डिजिटल, आऊटडोर मीडिया असा ‘पुढारी’ आता 360 डिग्री मिडिया हाऊस झाला आहे आणि आता एआयदेखील सज्ज होत आहे. यापुढे एआय आणि 5 जी मुळे मीडियामध्ये जे काय नवे फिल्ड येतील त्यामध्येसुद्धा ‘पुढारी’ आघाडीवर असेल असं आमचं ‘व्हिजन’ आहे. जाधव साहेबांनी पुढारीच्या सुवर्णमहोत्सवाला भारताचे पंतप्रधान आणण्याचे व्हिजन ठेवलं होतं आणि ते त्यांनी करून दाखविलं. पुढारीच्या सुवर्णमहोत्सव आणि अमृतमहोत्सव या दोन्ही कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान आणण्याची किमया फक्त साहेबच करू शकतात.
साहेब आणि पुढारी हे नातं अतुट आहे असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, साहेबांनी आमच्या कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांचा पुढारीत गेलेला आहे. गेली 55 वर्षे त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही.आहे, असं मला आठवत नाही. गेल्या सहा दशकात त्यांनी स्वतः पुढारी स्टाईल ऑफ जर्नालिझम डेव्हलप केली आहे आणि तशी माणसेही घडवली आहेत. एखाद्या गोष्टीचा त्यांनी ध्यास घेतला की, ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. विविध सामाजिक कामांसाठी सुध्दा साहेब याच डेडिकेशननं झटत राहिले आहेत. त्याचं अगदी ताजं उदाहरणं म्हणजे नुकतचं सुरू झालेलं कोल्हापूर सर्किट बेंच! या बेंचच्या लढ्याची इतिहास नोंद घेईल याची खात्री आहे.
कुणालाही भिडायचं डेअरिंग हा साहेबांचा पींड. माझे पणजोबांचे पैलवानकीचं संस्कार आणि डॅशिंग स्वभाव यामुळे साहेब लेखणीतून नेहमी संघर्ष करत राहिले असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, एकापेक्षा एक वैचारिक अग्रलेख, आक्रमक हेडलाईन्स, व्यवस्थेला प्रश्न विचारणार्या बातम्या यामुळे पुढारी जनतेच्या हातातील शस्त्र बनला. शेतकरी आंदोलन ते टोल आंदोलन, सीमा लढा ते मराठा आरक्षण लढा असे कितीतरी लढे इथं बसलेल्या सहकार्यांना आठवत असतील. एखादे प्रश्नावर कोंडी झाली तर शासनाला साहेबांची आठवण होते आणि लवाद म्हणून तेच प्रश्न सोडवतात, हीच त्यांची विश्वासार्हता आहे.
साहेबांच्याकडून मी प्रामुख्यानं तीन गोष्टी शिकलो ’व्हिजन, डेडिकेशन, डेअरिंग’ या तीन गोष्टी साहेबांकडून शिकलो, असे सांगत डॉ.जाधव म्हणाले, साहेबांच्याकडून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम. याच राष्ट्रप्रेमातून गुजरातचं हॉस्पिटल आणि ’सियाचीन’ चं मिलिट्री हॉस्पिटल बांधलं, त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती ही जबरदस्त आहे. त्यामुळेच त्यांनी यशाचं शिखर गाठले.
‘पुढारी’चे समूह संपादक योगेश (दादा) जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणाला उभा राहताच मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांचा उल्लेख ‘माझे वडील आणि पत्रकारितेतील भीष्माचार्य’ अशा शब्दांत करताच संपूर्ण सभा मंडप टाळ्यांच्या कडकडाटांनी नुसता दणाणून गेला. त्यामुळे काही वेळ योगेशदादा यांना आपले भाषण थांबवावे लागले. आपल्या भाषणात योगेशदादा यांनी दैनिक ‘पुढारी’ची स्थापनेपासून ते आजपर्यंतची वाटचाल, ‘पुढारी’ची ध्येयवादी पत्रकारिता, प्रतापसिंह जाधव यांनी घालून दिलेला आदर्श आणि निर्भीड पत्रकारितेचा वस्तुपाठ असा विविधांगी आढावा घेतला.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पत्रकारितेच्या ध्यासपर्वाचा आढावा घेताना योगेशदादा म्हणाले, साहेबांनी गेल्या 55 वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. एवढं त्यांनी पत्रकारितेला वाहून घेतले आहे. त्यामुळे साहेब, पुढारी परिवार आणि वाचकांमध्ये एक अतूट नाते निर्माण झालेले आहे. साहेबांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत हजारो माणसे घडविली. कुणालाही भिडायचा त्यांचा पिंड माझ्या पैलवान असलेल्या पणजोबांकडून घडला आहे. सामाजिक प्रश्नांसाठी साहेबांनी लोकांच्या बरोबरीने उभा राहून दिलेला लढा प्रेरणादायी आहे. त्यांचे देशप्रेम आणि जिद्द अप्रतिम आहे, विधायक पत्रकारितेचा ध्यास अपूर्व आहे आणि हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहेत.