कोल्हापूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्या प्रशात कोरटकर (रा. नागपूर) याला 12 वे सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) ए. ए. व्यास यांनी रविवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर कोरटकरच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर मंगळवारी (दि. 1) सुनावणी होणार आहे. या काळात त्याचा कळंबा कारागृहात मुक्काम राहणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याची अंडासेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात युक्तिवाद करताना कोरटकरच्या सुरक्षिततेबाबत भीती व्यक्त केली. कोरटकरला अटक झाल्यानंतर दोनवेळा पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या गराड्यातही त्याच्यावर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. जामीन अर्जावर सुनावणी होऊन तो मंजूर झाल्यास सणासुदीत तो कुटुंबीयांसमवेत राहील, असे अॅड. घाग यांनी सांगितले.
सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी त्यास हरकत घेतली. कोरटकरकडून गंभीर स्वरूपाचे कृत्य झाले आहे. समाजातून तीव— प्रतिक्रिया उमटत आहेत. जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी होणे शक्य नाही, असे स्पष्ट केले. त्यावर न्यायाधीश ए. ए. व्यास यांनी मंगळवारी (दि. 1) दोन्ही बाजूकडून म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे, संशयित प्रशात कोरटकर आज ऑनलाईन उपस्थित होते. न्यायालयीन कोठडीच्या आदेशानंतर कोरटकरला दुपारी प्रचंड बंदोबस्तात मध्यवर्ती कळंबा कारागृहात हलविण्यात आले. त्याची तत्काळ अंडासेलमध्ये रवानगी करण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी सांगितले. कोरटकरच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
कोरटकरची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास सकाळी 11 वाजता सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसरात रविवार सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला होता. ऐनवेळी ऑनलाईन सुनावणीचा निर्णय झाल्याने वरिष्ठ अधिकार्यांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरीचे श्रीराम कण्हेरकर आदी उपस्थित होते. ऑनलाईन सुनावणीला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.