कागल : लोकसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांनी स्वतःचा पूर्ण गटच विरोधकांच्या दावणीला बांधून प्रा. संजय मंडलिक यांचा विश्वासघात केला. या विश्वासघाताचा बदला मंडलिकप्रेमी विधानसभा निवडणुकीत घेतील, असा इशारा कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी दिला.
यापूर्वी मंडलिक- मुश्रीफ गटात जे झाले ते गंगार्पण करून नवीन अध्याय लिहायचे ठरले आहे, असेही ते म्हणाले. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रभाग क्रमांक सात, आठ व नऊमधील मतदारांच्या संपर्क बैठकीत गाडेकर बोलत होते.
गाडेकर म्हणाले, समरजित घाटगे यांना मी आव्हान देतो की, तुम्ही स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक व मुश्रीफसाहेब यांच्या संघर्ष काळामधील वक्तव्ये छापून मंडलिक गटाची मने कलुषित करून गैरसमज पसरवू नका. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रा. संजय मंडलिक यांना मते द्या व विजयी करा, असा उल्लेख कोणत्या भाषणात केला होता. लोकसभेला शिवसेना-शिंदे गटाकडून सात कोटी आणून ते तसेच दाबून ठेवले व आता विधानसभेला ते वर काढलात. त्यांनी चुलते प्रवीणसिंह घाटगे यांना छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार करायला सांगून त्यांनी पूर्ण गट प्रा. संजय मंडलिक यांच्या विरोधात घालविला, हे पूर्ण तालुका आणि जिल्हाही जाणतो.
मुश्रीफ म्हणाले, ज्या विश्वासाच्या भावनेने घाटगे व सौ. घाटगे यांनी गटात प्रवेश केला त्याला तडा जाऊ देणार नाही. घाटगे कुटुंबीय व त्यांच्या सहकार्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा राहीन. यावेळी भैया माने, चंद्रकांत गवळी, बाबगोंडा पाटील, नवल बोते, संजय ठाणेकर, अमित पिष्टे, अॅड. संग्राम गुरव, योगेश कदम आदी उपस्थित होते.