प्रकाश आवाडे  
कोल्हापूर

Prakash Awade | प्रकाश आवाडे लोकसभेच्या रिंगणात?

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; माने-आवाडे पारंपरिक राजकीय घराणी पुन्हा आमनेसामने

पुढारी वृत्तसेवा

संदीप बिडकर

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 2029 ची निवडणूक भाजप पक्षाने संधी दिल्यास निश्चितपणे लढवणार, असे वक्तव्य माजी आ. प्रकाश आवाडे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात दोन दिवस झाले खळबळ उडाली आहे. महायुतीच्या माध्यमातून सध्या शिंदे शिवसेना, भाजप एकत्र असल्याने शिंदे शिवसेनेचे खा. धैर्यशील माने हे नेतृत्व करतात. परंतु, भविष्यात भाजपने स्वतंत्रपणे हा मतदारसंघ लढवण्याचे निश्चित केल्यास आपण या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहोत, असे सूचक वक्तव्य प्रकाश आवाडे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. अद्याप निवडणुकीला तीन वर्षे असली, तरी त्याची तयारी आतापासूनच सुरू असल्याचे दिसत आहे.

पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत हातकणंगले व वडगाव मंडलाचे संयुक्त प्रशिक्षण रविवारी नरंदे येथे पार पडले. यावेळी आवाडे यांनी पक्षाच्या व्यासपीठावरूनच ही घोषणा केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. राष्ट्रीय पातळीवर सध्या लोकसभेचे मतदारसंघ वाढणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापुरात तीन लोकसभा मतदारसंघ होतील, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. त्या अनुषंगानेही आवाडे हे पुढील लोकसभेची तयारी करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे.

माने-आवाडे घराणी पारंपारिक विरोधक म्हणून गेली कित्येक वर्षे जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रात वावरत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही माजी आ. प्रकाश आवाडे यांनी लोकसभेसाठी तयारी केली होती व लढण्यावर ठाम होते. परंतु, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या शिष्टाईने पुन्हा त्यांनी शिंदे शिवसेनेच्या खा. धैर्यशील माने यांना पाठिंबा दिला. याचा परिपाक म्हणून खा. माने हे निवडून आले. सध्या आवाडे हे कोणत्याही राजकीय पदावर कार्यरत नाहीत. त्यामुळे भविष्यात ते लोकसभेच्या माध्यमातून दिल्लीचे राष्ट्रीय राजकारण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात भाजप भक्कम, पाहुण्यांचीही मिळणार साथ

सध्या जिल्ह्यामध्ये भाजप हा सर्वच पातळीवर भक्कम पक्ष म्हणून समोर येत आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी मिळाली, तर निवडून येण्यास काहीच अडचण नसल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर आवाडे यांच्या घराण्याबरोबर माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नुकतीच सोयरिक जुळली आहे. त्याचाही फायदा भविष्यात आवाडे यांना निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी आवाडे यांची बाजू भक्कम दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT