Prakash Abitkar on Shaktipeeth Highway
कोनवडे : विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा चर्चेत आलेल्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला शिरोळ व कागल तालुक्यांमध्ये तीव्र विरोध होत असतानाच, मार्गातील बदलांमुळे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील शेकडो हेक्टर बागायती जमीन बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
कोनवडे (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सह्यांचे निवेदन आबिटकर यांना सादर केले.
आबिटकर म्हणाले, विकास आवश्यक असला तरी तो शेतकऱ्यांचे नुकसान करून होऊ नये. कोणताही प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या संमतीशिवाय प्रकल्प राबवू नये आणि शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका लोकप्रतिनिधींनीही स्वीकारणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात पुढील भूमिका ठरवताना शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कोनवडे परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी करत एकत्रित निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाची माहितीही त्यांनी मांडली.
“आणायलाही आणि थांबवायलाही मीच” – प्रकाश आबिटकर
प्रकाश आबिटकर म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाला तेव्हा तो मतदारसंघात आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या भावना व अडचणी मांडल्या. त्यानंतर शिंदे यांनी या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली, असे त्यांनी सांगितले.