कोल्हापूर : इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांत कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक अडकले आहेत. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवा, संवाद करा आणि शासकीय यंत्रणेच्या समन्वयाने सर्वांना सुखरूप परत आणा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
आखाती देशांमध्ये अडकलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि त्यांच्या घरवापसीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात घेण्यात आला.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सतर्क आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा.निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव म्हणाले, आखाती देशात हल्ले झाल्यानंतर त्वरित प्रशासन अलर्ट राहिले आहे. केंद्र शासन, राज्य शासनाशी समन्वय साधला जात आहे. कोल्हापूरमध्ये दोन पर्यटन संस्था दुबई येथे सहलीसाठी गेल्या आहेत. त्या सर्वांशी संपर्क केला असून ते सुरक्षित ठिकाणी आहेत. रोज त्यांच्याशी दोन वेळा संपर्क केला जात आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ म्हणाले, संबंधित अडकलेल्या नागरिकांसह त्यांच्या कोल्हापुरातील कुटुंबीयासोबत सतत संपर्कात आहे. कोल्हापुरातील सर्व नागरिक सुरक्षित असून नोकरीसाठी असणारे तिथेच राहणार असून पर्यटनासाठी गेलेले परत येत आहेत.