कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेच्या वार्षिक अधिवेशनप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत वैद्यकीय अधिकारी. 
कोल्हापूर

Prakash Abitkar | नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य; १४०० वैद्यकीय अधिकारी पदे भरणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या जवळच्या आरोग्य संस्थेत आवश्यक उपचार, निदान व आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य विभागाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’, ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ यांसह विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.

ते म्हणाले, राज्यात रिक्त असलेल्या सुमारे १,४०० वैद्यकीय अधिकारी पदांवर नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, पदोन्नती प्रक्रियेलाही गती दिली जाईल. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवांवरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्यात येतील. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्व संवर्गांसाठी प्रभावी प्रशिक्षण धोरण राबवून नवीन तंत्रज्ञान, उपचारपद्धती व व्यवस्थापन कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी १०२ रुग्णवाहिका सेवा १०८ आपत्कालीन सेवेशी जोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांना प्रथमोपचार व सीपीआरचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. अधिवेशनाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश हरिदास यांनी केले. यावेळी माजी संचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील, डॉ. डोके तसेच संचालक डॉ. कंदेवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. बबिता कमलापूरकर यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, डॉ. गीत, डॉ. दिलीप माने, डॉ. संदीप सांगले, डॉ. अमित पाटील, डॉ. प्रवीण वेदपाठक, डॉ. आनंद गोसावी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT