‘प्राडा’ फॅशन शोमधील चप्पल ‘कोल्हापुरी’च! Pudhari File Photo
कोल्हापूर

‘प्राडा’ फॅशन शोमधील चप्पल ‘कोल्हापुरी’च!

जागतिक ब्रँडने अखेर श्रेय दिले; महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराला यश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : इटालियन फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने त्यांच्या मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेली चप्पल ही पारंपरिक भारतीय कारागिरीचा वारसा सांगणारी ‘कोल्हापुरी चप्पल’ असल्याचे अखेर मान्य केले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या हस्तक्षेपानंतर ‘प्राडा’ ग्रुपने ही भूमिका जाहीर केली. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ‘प्राडा’चे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली होती.

कोल्हापुरातील चप्पल कारागिरांनी केलेल्या तक्रारीनंतर चेंबरने हा विषय उचलून धरला होता. भारतीय कारागिरांचा आवाज महाराष्ट्र चेंबरने जागतिक व्यासपीठावर पोहोचवला. ‘प्राडा’ने आपल्या उत्तरात म्हटले की, ‘भारतीय पारंपरिक हस्तकलेचे महत्त्व आम्हाला उमगले असून, जबाबदारीने डिझाईन पद्धती, सांस्कृतिक सहभाग आणि स्थानिक कारागिरांशी थेट संवाद साधण्याची आमची तयारी आहे.’ भारतीय वारशाला प्रामाणिक सन्मान देण्याचा निर्धारही व्यक्त केला.

वाद काय होता?

‘प्राडा’ कंपनीच्या फॅशन शोमध्ये पुरुष मॉडेल्सनी कोल्हापुरी चप्पल परिधान केले होते. मात्र, या चप्पलचा उल्लेख ‘कोल्हापुरी चप्पल’ असा न करता ‘इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन’ असा केला होता. तसेच, ‘प्राडा’ कंपनीचा टॅग लावून एक लाख रुपयांना ही चप्पल विकण्याचा घाट घातला होता. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर टीका सुरू होती. तसेच, कोल्हापुरी चप्पल बनवणार्‍या कारागिरांनीही याविरोधात संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय पारंपरिक कारागिरीच्या अस्मितेला धक्का बसल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरने केला.

लोकप्रतिनिधीही सरसावले

कोल्हापुरी चप्पलचे श्रेय नाकारणार्‍या ‘प्राडा’ कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनीही लावून धरली होती. खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती. स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे यांनीही ‘प्राडा’ने कोल्हापुरी चप्पलचे महत्त्व नाकारल्याबद्दल थेट इशारा दिला. कोल्हापूरचा वारसा जपणार्‍या कारागिरांची ही फसवणूक असल्याचे सोशल मीडियावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT