सुनील सकटे
कोल्हापूर :
विजेची वाढती थकबाकी आणि विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी येणार्या अडचणी यावर मात करण्याचे काम स्मार्ट मीटरने केले आहे. राज्यात स्मार्ट मीटरची एकप्रकारे चाचणीच घेण्याचे काम ‘प्रकाशगड’ मुख्यालयातून करण्यात आले. 19 फेब्रुवारीच्या दरम्यान मुंबईतून एका क्लिकवर राज्यातील सुमारे सव्वा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अचानक वीज गायब झाल्याने ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.
महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सेवा देण्यावर भर दिला आहे. गो ग्रीन, ऑनलाईन वीज बिल भरणे, ग्राहकांच्या नावात-पत्त्यात बदल, विद्युत भार कमी-जास्त करणे, अशी अनेक कामे आता ऑनलाईन करण्याची सोय केली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून आता स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना आपल्या विजेचा वापर कोणत्या वेळी किती झाला. याची अचूक माहिती मिळण्यास मदत झाली आहे. तसेच स्मार्ट मीटर महावितरणला सोयीचे ठरले आहे. मीटर रीडिंग थेट महावितरणच्या कर्यालयात जमा होते. त्यामुळे मिटर रीडिंगसाठी धावाधाव करावी लागत नाही. तसेच अचूक बिलिंग होत असल्याने वापरलेल्या विजेचे अचूक पैसे वसूल होण्याची सुविधा झाली आहे.
बिल भरलेल्या 67 टक्के म्हणजेच 81 हजार 515 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. मात्र 33 टक्के म्हणजे 40 हजार 119 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे मुख्यालयाने सर्व कार्यकारी अभियंत्यांना या ग्राहकांची उलटतपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे आता थकबाकीदारांची गय होणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
असा प्रयोग प्रथमच
या स्मार्ट मीटरचा वापर करून महावितरण कंपनीने राज्यातील घरगुती व्यापारी आणि औद्योगिक अशा स्मार्ट बसविलेल्या एक लाख 21 हजार 664 थकबाकीदार ग्राहकांचा मुंबईतून एका क्लिकवर वीजपुरवठा खंडित केला. वीज क्षेत्रातील इतिहासात असा प्रयोग प्रथम झाल्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली.