डॅनियल काळे
कोल्हापूर : जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी महायुतीमध्येच संघर्ष उफाळून आला असून, अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सर्वाधिक जागा आपणच मिळवल्या असल्याने अध्यक्षपदावर आपलाच हक्क असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. ‘जो न्याय महापालिकेत, तोच न्याय जिल्हा परिषदेत’ या भूमिकेसाठी मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे, ‘भाजप आणि जनसुराज्य दोन जान, एक दिल’ असल्याचे सांगत भाजपचाच अध्यक्ष झाला पाहिजे, असे स्पष्ट वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने राजकीय समीकरणांना वेग आला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाला आहे. महापालिकेनंतर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला सत्ता समीकरणे जुळवावी लागणार आहेत. महापालिकेत भाजपला 26 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या. गेली दोन दशके महापालिकेच्या सत्तेत प्रभावी राहिलेल्या राष्ट्रवादीला यंदा मर्यादित यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. जिल्हा परिषदेत मात्र राष्ट्रवादी काँग्रसेने 20 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ‘मोठा भाऊ’ म्हणून अधिक पदांवर दावा करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर व्हायचा असला तरी गटनेत्यांच्या निवडी पूर्ण झाल्या असून, आघाड्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. अध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव असल्याने दोन्ही पक्षांत इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी, मनधरणी आणि अंतर्गत चर्चांना वेग आला आहे. आघाड्यांची अधिकृत नोंदणी झाल्यानंतरच अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीतच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्तासमीकरणांचा पुढील अंक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसकडून गुगली
जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे 15 सदस्य निवडून आले आहेत. महायुतीमधील भांडणाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी गुगली टाकली असून, राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान देण्यासाठी आम्ही मदत करू, असे आश्वासन देऊन त्यांनी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महायुतीऐवजी सतेज पाटील यांचा हा पर्याय मुश्रीफ निवडतील का? महायुतीचे नेते राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा सन्मान देणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.