जुना कळंबा नाका येथे रस्‍त्‍यावर तिरडी ठेवत मृत गायकवाड यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक यांनी महापालिकेचा निषेध केला.  
कोल्हापूर

kolhapur | खड्ड्यामुळे मृत्यू; रस्त्यावरच तिरडी ठेवून निषेध

जुना कळंबा नाका येथे आंदोलन; आणखी किती बळी गेल्यावर डागडुजी करणार? संतप्त नातेवाईक, नागरिकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : जुना कळंबा नाका येथील खड्ड्याने राजेंद्र दिनकर गायकवाड (वय ५३, रा. राजर्षी शाहू गल्‍ली, कळंबा, ता. करवीर) या सराफ व्‍यावसायिकाचा बळी घेतला. शनिवारी (दि. ११) सकाळी त्यांचा मृतदेह अंत्‍यसंस्‍कारासाठी घेऊन जाताना नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तिरडी त्याच रस्‍त्‍यावर ठेवत महापालिकेचा निषेध केला. आणखी किती बळी गेल्‍यावर रस्‍त्‍यांची डागडुजी करणार, असा संतप्त सवाल केला.

कोल्‍हापूर-गारगोटी राज्‍य मार्गावर जुना कळंबा नाका येथे खड्डा पडला होता, त्या खड्ड्यात जाऊन नियंत्रण सुटलेल्या भरधाव दुचाकीने गुरुवारी (दि. ९) रात्री साडेआठ वाजण्‍याच्‍या सुमारास चालत जाणाऱ्या गायकवाड यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत सुमारे वीस फूट दूर फेकले गेलेल्या गायकवाड यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्‍णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र शुक्रवारी (दि. १०) रात्री त्यांचा मृत्‍यू झाला. धडकेनंतर खड्डा मुजवला; पण... : अपघातानंतर मनपाने तो खड्डा मुजवला; पण त्यापुढे मुख्‍य रस्‍त्‍यावर असलेला खड्डा महापालिकेला दिसला नाही. पालकमंत्री याच रस्‍त्‍यावरून ये-जा करतात. ते तरी सूचना करणार का, असा सवाल आहे.

तीन महिलांचा जीव वाचला

धडक दिलेले तरुण नशेत होते. गायकवाड यांना धडक बसल्‍यामुळे रस्‍त्‍याकडेला बसलेल्‍या तीन भाजी विक्रेत्या महिलांचा जीव वाचला. गायकवाड नसते तर दुचाकी या महिलांना धडकली असती, अशी चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT