kolhapur | ‘करेक्ट नियोजन’ अन् ‘भल्लाळदेव’वरून पोस्टर वॉर 
कोल्हापूर

kolhapur | ‘करेक्ट नियोजन’ अन् ‘भल्लाळदेव’वरून पोस्टर वॉर

पोलिसांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने हटवली पोस्टर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महापालिका निवडणुकीनंतर ‘पोस्टर वॉर’ रंगले आहे. यामध्ये मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर येथे लावलेले फलक शनिवारी चर्चेचा विषय बनले. बाहुबली चित्रपटातील ‘भल्लाळदेव’ या अभिनेत्याचे छायाचित्र असणारे फलक आणि त्याच्याच शेजारी ‘करेक्ट नियोजन’ असे शीर्षक असणार्‍या फलकांचा यामध्ये समावेश आहे. या फलकांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने दोन्हीही फलक हटवले.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चुरशीची झाली. नेत्यांसोबतच उमेदवारांमध्येही कोपरा सभा, बैठकीवेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रचाराच्या अंतिम दिवसापर्यंत हे चित्र होते. विरोधकांच्या कुमकवत बाजू शोधून प्रभागात तसेच शहराच्या प्रमुख चौकात एकमेकांविरोधात फलक लावण्यात आले. मनपा निवडणूक निकालानंतर पोस्टर वॉर संपेल, असे अपेक्षित होते. परंतु निकालानंतर पोस्टर वॉर जोरात सुरू झाले आहे. विशेष म्हणजे शिवाजी पेठेतील दोन बंधू आणि त्यांच्या समर्थकांकडून लावलेले पोस्टर्स गेले काही दिवस चर्चेचा विषय बनले आहेत.

मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर येथे त्यांच्याकडून फलक लावले होते. ‘ईव्हीएम जिंदाबाद’ असे शीर्षक असणारे फलक लावल्यानंतर या विरोधात नेत्यासोबत चहा पित असणारे फलक लावले. यावर ‘चहा चर्चा करेक्ट नियोजन’ असा केलेला उल्लेख विरोधकांना झोंबला. त्यांनी जुने पोस्टर काढून शनिवारी विरोधकांनी लावलेल्या नेत्यांच्यासोबत छायाचित्र असलेल्या फलकाच्या शेजारी नवीन फलक लावले. यापैकी बिनखांबी गणेश मंदिर येथे बाहुबली चित्रपटातील भल्लाळदेवचे छायाचित्र आणि त्यावर ‘कधी काळी भल्लाळदेवही नजरचुकीने गादीवर बसला होता’, असा उल्लेख केला होता; तर मिरजकर तिकटी येथे लावलेल्या फलकावर बाहुबली चित्रपटातील भल्लाळदेव, बिज्जलदेव यांचे फोटो आणि त्यावर ‘भल्लाळदेव बिज्जलदेव महानगरपालिकेच्या भविष्यातील लुटमारीवर चर्चा करताना’ असा उल्लेख केला होता. हे फलक विरोधकांचे नेत्यासोबत चहा पितानाचे छायाचित्र आणि त्यावर ‘चहा चर्चा करेक्ट नियोजन’ असा उल्लेख असणार्‍या पोस्टरशेजारीच लावले गेले.

शहरासह सोशल मीडियावरही फलकांची चर्चा

एकमेकांविरोधातील या फलकांमुळे संबंधितांच्या प्रभागात तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी मनपा प्रशासनाला हे फलक हटविण्याची सूचना केली. शनिवारी सायंकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर येथील चारही फलक हटवले. दरम्यान, या फलकांची चर्चा शहरात सर्वत्र झाली. सोशल मीडियावरही हे फलक झळकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT