MD drugs gang rivalry | एमडी ड्रग्जवरून टोळी युद्धाची शक्यता! 
कोल्हापूर

MD drugs gang rivalry | एमडी ड्रग्जवरून टोळी युद्धाची शक्यता!

कळंबा कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारांची इचलकरंजीत हालचाल वाढली

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : वस्त्रनगरीत एमडी (मेफेड्रोन) या घातक ड्रग्जचा वाढता शिरकाव आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. अलीकडेच आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनिष नागोरी याच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांच्या हाती लागल्याने शहरातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे उलगडू लागले आहेत. या प्रकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ड्रग्जच्या साखळीत मोठ्या शहरांशी संबंध असल्याची चर्चा सुरू असून इचलकरंजीतून या अवैध व्यवसायाचे जाळे विस्तारत असल्याची शक्यता आहे. मोठे कमिशन मिळत असल्याने या धंद्याकडे गुन्हेगारांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे, कळंबा कारागृहातून शिक्षा भोगून आलेले व जामिनावर सुटलेले काही गुन्हेगार या व्यवसायात सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ड्रग्ज विक्रीच्या नियंत्रणावरून शहरातील गुन्हेगार टोळ्यांमध्ये तणाव वाढत असल्याची चर्चा असून भविष्यात टोळी युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांवरून फायरिंगसारखे गंभीर प्रकार घडू लागले असून अनेक गुन्ह्यांच्या मागे अवैध व्यवसायांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. ड्रग्जच्या विविध प्रकारांनुसार दर वेगवेगळे असल्याने विक्रीवरूनही गुन्हेगारांमध्ये स्पर्धा वाढली आहे. कोणत्या भागात विक्री करायची, कोणाचा प्रभाव राहणार यावरून टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समजते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची शक्यता अधिक बळावत आहे.

तुरुंगातून सुटल्यानंतर काही गुन्हेगारांची जीवनशैलीही अचानक बदलताना दिसते. सुरुवातीला दुचाकींवर फिरणारे हे गुन्हेगार काही महिन्यांतच महागड्या चारचाकींतून वावरताना दिसतात. वाहनांवर काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट आणि राज्याबाहेरील वारंवार दौरे यामुळे त्यांच्या आर्थिक स्रोतांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात एमडी ड्रग्जच्या वाढत्या विक्रीमुळे नशेच्या आहारी जाणार्‍या तरुणांची संख्या वाढत असल्याचेही चिंताजनक चित्र आहे. सांगली, कोल्हापूरसह आसपासच्या भागातील गुन्हेगारांचे इचलकरंजीतील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

गुन्हेगारच किंगमेकर

काही गुन्हेगारांचे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध शहरांत अवैध व्यवसाय सुरू असल्याचेही बोलले जाते. महापालिका निवडणुकीदरम्यान काही गुन्हेगारांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. निवडून आलेल्या उमेदवारांच्या जल्लोष रॅलीत किंगमेकर म्हणून दर्शविणारे बॅनर झळकल्याने त्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याची चर्चा शहरात रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT