कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी एक खास सांस्कृतिक मेजवानी पुढारी नाट्योत्सव घेऊन येत आहे. सध्याच्या काळातील नातेसंबंध, पिढ्यांमधील अंतर आणि बदलत्या जीवनशैली अशा ज्वलंत विषयांवर खुसखुशीत भाष्य करणार्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या दोन दमदार नाटकांचे प्रयोग ‘नाट्योत्सवा’च्या निमित्ताने कोल्हापुरात होत आहे. आनंद भवन, सायबर कॉलेज कॅम्पस येथे मंगळवारी (दि.7) ‘नियम व अटी लागू’ आणि बुधवारी (दि. 8) ‘आमने-सामने’ नाटक सादर होणार आहे.
मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ हे नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. या दोन दिवसीय नाट्योत्सवात, मराठी रंगभूमीवरील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या दोन लोकप्रिय आणि विचारप्रवर्तक कलाकृती सादर होणारआहेत.
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि संकर्षण कर्हाडे लिखित हे नाटक आजच्या तरुणाईच्या जीवनावर आधारित आहे. पती-पत्नीच्या नात्यातील बदलत्या अपेक्षा आणि त्यांना लागू केलेले ‘नियम व अटी’ पाळताना होणारी विनोदी कसरत यात पाहायला मिळते. संकर्षण कर्हाडे आणि अमृता देशमुख यांची भूमिका असलेले हे नाटक प्रेक्षकांना भरपूर हसवते आणि विचार करायलाही लावते.
दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांच्या दिग्दर्शनाखालील हे नाटक कुटुंबातील दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर आणि लग्नसंस्थेवर आधारित आहे. ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या नाटकाचे मुख्य आकर्षण आहे. पिढीनुसार बदलणार्या नात्यांचे आयाम अत्यंत रंजक पद्धतीने यात मांडले आहेत.
सर्व रसिक नाट्यप्रेमी आणि रसिकांनी आपल्या कुटुंबीयांसोबत व मित्रपरिवारासोबत मराठी रंगभूमीच्या या लोकप्रिय कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी नाट्यगृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.