कोल्हापूर : घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरील वळणावर डंपरने चिरडल्याने पूनम शिंदे यांचा मृत्यू झाला. चर्चसमोरील खराब रस्ते, खड्डे यामुळेच त्यांचा बळी गेल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांनी केला. यातच शहरात अवजड वाहनांना बंदी असताना डंपर शहरात आलाच कसा, असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला. पूनम घराला हातभार लावण्यासाठी घरातच शिकवणी घेणे, अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्धांची सुश्रुषा करणे, तसेच घरगुती उद्योग करून चार पैसे कमावत होत्या. मोठी मुलगी एंजल नर्सिंगच्या द्वितीय वर्षाला तर लहान आराधना बारावीचे शिक्षण घेते. डोळ्यादेखतच आईचा मृत्यू झाल्याने एंजलला मानसिक धक्का बसला.
वाढदिवस व मृत्यू एकाच तारखेला
पूनम यांचा २१ नोव्हेंबरला वाढदिवस असतो, दोन महिन्यानंतर त्यांचा वाढदिवस होता. सोमवारी, २१ सप्टेंबरलाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. जन्म व मृत्यू एकाच तारखेला झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
ट्रेड सेंटरपासून सासने मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था आहे. अपघातापासून काही अंतरावरच खडी उकरली आहे. यामुळेच मोपेड घसरल्याचा अंदाज आहे.
ते वळण धोकादायकच
दाभोळकर कार्नर सिग्नलपासून खाली आल्यानंतर चर्चकडे जाणारे वळण तीव्र आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्याच्या सूचना नागरिकांनी केल्या, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले.
अवजड वाहनांना बंदी कागदावरच
शहरात दिवसभर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही दगडाने भरलेला डंपर शहरातून बिनदिक्कत फिरत होता. शहर वाहतूक शाखेने याकडे लक्ष दिले असते तर कदाचित शिंदे यांचा जीव वाचला असता.