कोल्हापूर : शहरातील माऊली पुतळा ते सायबर चौक रस्त्यावरील दौलतनगरजवळ असे मोठे खड्डे पडले आहेत.  Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Road Problems | रस्त्यांचे हाल, रिक्षाचालक बेहाल!

खड्ड्यांतून रिक्षा चालवताना पेन किलर अनिवार्य; खर्चाने आर्थिक गणितही कोलमडले

पुढारी वृत्तसेवा
डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कुठे रस्त्यावर खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, हेच कळेनासे होत आहे. या खड्ड्यांच्या तडाख्यामुळे शहरातील रिक्षाचालक अक्षरशः जगण्याशी झगडत आहेत. पाठदुखी, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, मानदुखी अशा गंभीर शारीरिक समस्यांनी त्यांचे आयुष्य पोखरले आहे. त्यातच रिक्षाच्या देखभालीचा खर्च आणि स्वतःच्या उपचाराचा खर्च या दुहेरी खर्चामुळे त्यांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे.

दोन दशकांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे. 2005 च्या महापुरानंतर रस्ते अक्षरशः वाहून गेले. त्यावेळी महापालिकेकडे निधी नव्हता. त्यामुळे ‘बांधा-वापरा-हस्तांतर करा’ या तत्त्वावर प्रकल्प उभारण्यात आला. 2008 मध्ये खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून 50 कि.मी. रस्त्यासाठी 220 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यानंतर नगरोत्थान योजनेतून 108 कोटी, लिंक रोड प्रकल्पातून 24 कोटी, विविध आमदार-खासदार निधीतून आणि महापालिकेच्या माध्यमातून एकूण 1000 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. तरीही रस्त्यांची अवस्था दयनीयच राहिली.

रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, दर पावसाळ्यात नव्याने बनवलेले रस्तेही वाहून जात आहेत. याचा थेट फटका रिक्षा चालकांना बसतो. टायर वारंवार बदलावे लागतात. ब्रेक लायनिंग आणि शॉक अब्झॉर्बर्स तुटतात. देखभालीचा खर्च गगनाला भिडतो. आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि दवाखान्यातल्या खर्चामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळते. कोल्हापूरच्या रस्त्यांवरील खड्डे हे रिक्षा चालकांसाठी केवळ अडथळेच नाहीत, तर त्यांच्या आरोग्याला घातक ठरणारे गंभीर धोके आहेत.

ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून महागड्या उपचारांचा खर्च सहन करत आहोत. केसपेपरही महागला आहे. औषधंही महागली आहेत. व्यवसाय मंदावला, रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आमचं जगणं कठीण झालं आहे.
अविनाश दिंडे, कॉमन मॅन रिक्षा संघटना
खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांची हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत. लाखोंचा उपचार खर्च खिशाला भेडसावत आहे. पेन किलर गोळ्यांवरच काम करावं लागतं. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिका व राज्य शासनाने योग्य योजना आखून दर्जेदार रस्ते तयार करावेत.
शिवाजी पाटील, विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT