सागर मोरे
कोल्हापूर : नालेसफाईचा बोजवारा, ठिकठिकाणी तुंबलेल्या गटारी आणि कचऱ्याचे कुजणारे ढीग यामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. दूषित पाणी आणि डासांची पैदास यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या धोकादायक आजारांचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासकीय अनास्था आणि नागरिकांचे थोडेसे दुर्लक्ष यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
कीटकजन्य आजार : साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा प्रसार होतो.
जलजन्य आजार : गटारीचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळांमध्ये मिसळल्याने गॅस्ट्रो, टायफॉईड, कावीळ आणि विषमज्वर होतो.
त्वचेचे विकार व श्वसनाचे आजार : कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे त्रास, ॲलर्जी तसेच दूषित पाण्याच्या संपर्काने त्वचाविकार, खाज आणि बुरशीजन्य संसर्ग होतो.
उघड्या व तुंबलेल्या गटारी : नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येणे.
ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग : प्लास्टिक आणि ओल्या कचऱ्यात माशा व कीटकांची मोठ्या प्रमाणावर पैदास.
पिण्याच्या पाण्यात दूषित घटकांचे मिश्रण : जुन्या आणि गळती असलेल्या पाईपलाईनमुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी : पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांसाठी ते प्रजनन केंद्र बनते.
पाणी उकळून व गाळून प्या : पावसाळ्यात नेहमी पाणी कमीत कमी १० ते १५ मिनिटे उकळूनच प्यावे.
बाहेरचे व उघड्यावरील अन्न टाळा : रस्त्यावरील उघडे, शिळे किंवा दूषित पाण्यातील
अन्नपदार्थ अजिबात खाऊ नका.
साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा : पाण्यातून चालावे लागल्यास घरी आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून वाळवा.
डासांपासून संरक्षण करा : घरात व परिसरात पाणी साचू देऊ नका; फुलदाण्या, कुलर दर आठवड्याला साफ करा.