पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील दालमिया साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे कासारी नदी आणि परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होत असल्याबाबतचे वृत्त दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध होताच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी तातडीने कारखान्यास भेट देऊन सविस्तर पाहणी केली. यावेळी कारखान्यातील विविध प्रकल्पांची तपासणी करण्यात आली असून, पुढील आठवड्यात कारखाना बंद ठेवून सर्व तांत्रिक त्रुटी सुधारण्याची ग्वाही कारखाना प्रशासनाने दिली आहे.
दालमिया कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे पोर्ले, आसुर्ले आणि माजगाव परिसरातील पिकांचे नुकसान झाले होते. तसेच कासारी नदीच्या पाण्यावरही राखेचे थर साचले होते. याप्रकरणी जनक्षोभ उसळल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास मातकर यांनी पथकासह कारखान्यात धाव घेत माजगाव येथील बाधित भाजीपाला पिकांची आणि शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.? दरम्यान कारखान्याचा भुस्सा विभाग, ईटीपी प्लांट, ओढा आणि राख साठवणूक प्रकल्पाची (ॲश प्लांट) बारकाईने तपासणी केली. ओढ्यातील प्रदूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
तसेच हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी मोजण्यासाठी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर तत्काळ हवा प्रदूषण तपासणी यंत्रणा बसवण्यात आली आहे.यावेळी कारखाना प्रशासनाने आपली चूक मान्य केली. यापूर्वी कारखान्याच्या युनिट हेड यांनी ‘राख शेतीला पोषक’ असल्याचे हास्यास्पद विधान केले होते, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कडक कारवाईनंतर प्रशासनाने नमती भूमिका घेतली. पुढील आठवड्यात कारखाना पूर्णपणे बंद ठेवून यंत्रणेतील सर्व त्रुटी दूर केल्या जातील आणि यापुढे राख बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रोहिदास मातकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल व जलद कारवाईबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, केवळ पाहणीवर न थांबता कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी ग््राामस्थांमधून होत आहे.