Pollution Health Risk | प्रदूषण, धुळीच्या मार्‍यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढतोय Pudhari File Photo
कोल्हापूर

Pollution Health Risk | प्रदूषण, धुळीच्या मार्‍यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढतोय

दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम; श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ, सर्दी, खोकल्याच्या तक्रारी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाढत असून ही गंभीर बाब आहे. सकाळी आणि संध्याकाळी धुक्याची चादर पसरल्याचे दिसून येते. अशा दूषित हवेमुळे श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ, सर्दी, खोकला अशा तक्रारी घेऊन रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. वैद्यकीय तपासणीत न्यूमोनियाचे निदान होत आहे. वॉकिंग न्यूमोनिया संक्रमणाची लक्षणेही वाढू लागली आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सामान्य न्यूमोनियात तीव— ताप, श्वास घेण्यासाठी अडथळा, गंभीर स्थितीत ऑक्सिजनची गरज भासते; परंतु वॉकिंग न्यूमोनियाच्या तुलनेत थोडा हलका असतो. त्यामुळे रुग्ण दैनंदिन दिनक्रम सुरू ठेवू शकतो; पण केव्हाही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. वॉकिंग न्यूमोनिया हा लहान मुलांमध्ये तसेच एकत्र काम करणार्‍या कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. थंडीत या आजाराची लक्षणे सौम्य असतात. त्यामुळे फारशा तक्रारी दिसत नाहीत; पण त्रास होतो. दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो.

न्यूमोनियाची लक्षणे

या आजाराची लक्षणे इतर आजारापेक्षा वेगळी आहेत. श्वसनसंसर्गासारखी असल्याने अनेक रुग्णांना त्याची जाणीवही होत नाही. दीर्घकाळ खोकला, ताप, घसा खवखवणे, थकवा, छातीत जडपणा ही प्रमुख लक्षणे आहेत. गर्दीच्या ठिकाणी राहणार्‍या विद्यार्थ्यांत आणि 5 ते 17 वर्षे वयोगटात हा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो.

संक्रमणामुळे प्रसार

संक्रमित रुग्णाच्या खोकला किंवा शिंकेतील सूक्ष्म थेंबाद्वारे हा आजार पसरतो. शाळा, कॉलेज, मेळावे, मॉल, कार्यक्रम, ऑफिस अशा बंद जागांमध्ये प्रसार अधिक होतो. प्रदूषित वातावरण, धुरकट हवा आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असणार्‍या व्यक्तींना धोका अधिक असतो.

वैद्यकीय उपचार

प्राथमिक तपासणी करून छातीचा एक्स-रे करावा लागतो. मायक्रोप्लाझ्माशी संबंधित चाचण्या करून आजाराचे निदान केले जाते. सौम्य अँटिबायोटिक्स, विश्रांती, मुबलक पाणी पिणे, धूळ, धूर यापासून लांब राहणे. अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही.

वॉकिंग न्यूमोनिया सौम्य न्यूमोनिया

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते वॉकिंग न्यूमोनिया (मायक्रोप्लाझ्मा पेन्यूमोनिया) या बॅक्टेरियामुळे होणारा प्रकारचा न्यूमोनिया आहे. या आजारात रुग्ण गंभीरपणे आजारी पडत नाहीत. नियमित कामे करू शकतात. त्यामुळे त्याला वॉकिंग न्यूमोनिया असे म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT