कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे अडथळे दूर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षीय बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, नेत्यांशी संपर्क आदी प्रक्रिया सध्या गतीने सुरू असून गल्लीबोळात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार आपापल्या भागात जनसंपर्क वाढवण्याच्या तयारीत दिसत आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांत हा संघर्ष दिसून येणार असला तरी त्याचे मूळ स्वरूप आ. महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील असेच राहणार आहे. बदलत्या राजकारणात त्याला केवळ पक्षीय रंग चढला आहे.
भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक बैठक पार पडली असून पुढील टप्प्यांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग वाढवला जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक ही भाजपची बलस्थाने असून कार्यकर्त्यांच्या फौजेसह पक्ष मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेवर सत्ता असलेल्या काँग्रेसने पुन्हा सत्ता राखण्याचे लक्ष ठेवले आहे. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यरत आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसची थेट साथ मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावर लढावे लागण्याची शक्यता आहे. खासदार शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे, ऋतुराज पाटील यांचे योगदान पक्षाच्या यशासाठी निर्णायक ठरणार आहे.
शिंदे गटाचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या काही वर्षांत काही प्रभागांमध्ये सक्रिय कामगिरी केली आहे. सत्यजित कदम यांचे पक्षात आगमन ही शिंदे गटासाठी बळकटी देणारी बाब ठरत आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी हे नेते संघटित काम करण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही गटांचा प्रभाव वेगवेगळ्या प्रभागांमध्ये दिसून येतोय.
अजित पवार गटाने काही ठिकाणी जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. आदिल फरास, उत्तम कोराणे, प्रकाश गवंडी, महेश सावंत, विनायक फाळके हे माजी नगरसेवक सक्रिय असून त्यांच्या जोरावर पक्ष निवडणुकीत काही जागांवर आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांच्या गटाकडूनही काही उमेदवार रिंगणात असतील, अशी शक्यता आहे.