कोल्हापूर : भारतीय समाजव्यवस्थेत स्वतःला सर्वज्ञ समजणारा एक वर्ग आहे. कोणत्याही गोष्टीचे राजकारण केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. कोणतीही घटना घडो, त्याला राजकीय चष्म्यातून पाहून उतावीळपणे टीकाटिपणी करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. अशा वर्गाला आता देशाच्या सुरक्षिततेचे क्षेत्रही वगळावेसे वाटत नाही. मग यामध्ये काही बडे राजकारणी आहेत. उतावीळ झालेली माध्यमे आणि समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालणारे काही विद्वानही आहेत. देशाच्या सीमेवर शत्रू उभा असताना त्यांना गोपनीयतेचे भान राहत नाही. अशा प्रवृत्तींनी स्वतःहून आपणावर काही बंधने घालून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कारण शत्रूसमोर उभे राहताना देश एकसंध राहण्याऐवजी अशा वाचाळांच्या बेताल बडबडीने देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो आणि शत्रूलाही नेमक्या याच संधीचा फायदा होतो. भारतीय लष्कराने ऑपरेशन ‘सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करून भारतातील टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. पण, अशा वाचाळांच्या जीभांना आणि मेंदूंना आवर घालण्यासाठी निर्बंध आणण्याची वेळ आली.
शत्रू सैन्याविरुद्ध करावयाच्या कारवाईचा आराखडा ही जाहीर प्रकटनाची बाब असू शकत नाही. पण, नेमका याच गोष्टीचा फायदा देशातील काही राजकीय नेते घेत आहेत. यामध्ये काही निवृत्त लष्करी अधिकार्यांचाही समावेश होता. त्यांनी भारतीय लष्कराच्या सामर्थ्यावर संशय घेतला. केंद्र सरकारच्या कर्तृत्वावर बोट ठेवले, तर काही जणांची पहलगाम येथील हत्याकांड हा अंतर्गत बेबनाव असल्याचे सांगण्यापर्यंत मजल गेली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्यावर चर्चेचा रवंथ करण्यामध्ये ही मंडळी मश्गुल होती. विशेषतः युद्धस्थितीमध्ये ही वाचाळगिरी बंद झाली पाहिजे. कारण ही दुफळी राष्ट्राच्या एकसंधतेला बाधा आणणारी आहे.
पहलगाम येथील घटनेनंतर सार्या जगभर हळहळ व्यक्त झाली. जगातील अनेक देशांनी घटनेची निंदा करीत भारताला पाठिंबा व्यक्त केला. देश एका शोकसागरात बुडाला असताना सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, केंद्र सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणे आवश्यक असताना राजकारणातील वृत्तवाहिन्यांच्या बाईटस्साठी चटावलेल्या राजकारण्यांनी या प्रश्नामध्ये राजकारणाला प्राधान्य दिले.
75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर आजही भारतीय समाज राष्ट्रीय संकटावेळी जर फुटण्याच्या मानसिकता दाखविणार असेल, तर त्याचा शत्रूला निश्चितच फायदा होऊ शकतो. युद्धजन्य स्थितीमध्ये जनतेने कसे वागावे, याचे काही अलिखित नियम आहेत. सर्वपक्षीय राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही भारतीय एकत्र आहोत, असा संदेश कृतीने देणे आवश्यक असतो. यामुळे सीमेवर लढणार्या लष्कराला बळ मिळते. केंद्र सरकारला ताकद मिळते आणि शत्रूच्या उरात धडकी भरते.