दिलीप भिसे
कोल्हापूर : राजकीय लागेबांधे अन् हप्तेखोरीमुळे निर्ढावलेल्या खासगी सावकारांकडून गोरगरिबांच्या संसाराची राखरांगोळी होत असताना किंबहुना नामचिन गुंडांच्या दहशतीमुळे जिल्ह्यात निष्पापांच्या एका पाठोपाठ एक आत्महत्या होत आहेत.
सावकारी पाशातून कोरोची (इचलकरंजी), मूरगूड परिसरात दोन कुटुंबीयांचा भरला संसार उद्ध्वस्त झाला. ६ लाखांच्या सावकारी कर्जापोटी अडीच कोटींची वसुली झाली. इचलकरंजीत एका माजी नगरसेवकांसह साथीदारावर गुन्हे दाखल होऊनही स्थानिक यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत आहे. सावकारशाहीने बेधडक धिंगाणा घातला असतानाही गुंडागर्दी करणाऱ्या ‘सुपारी बाजां’च्या पाठराखणीचा प्रयत्न होत आहे. ही समाज मन सुन्न करणारी स्थिती आहे.
फुलेवाडी रिंगरोडवर वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय गृहिणीने उद्योग, व्यवसायासाठी २०२१ मध्ये शिवाजी पेठेतील खासगी सावकाराकडून दरमहा १० टक्के व्याज दराने ६ लाखांचे कर्ज घेतले होते. अनेक घटनांत सावकारी कर्जाचे हप्ते भरण्यास विलंब झाल्याने व्याज, दंड व्याज, त्यावर पुन्हा १० टक्के व्याजाची आकारणी, वसुलीसाठी गुन्हेगारी टोळ्यांची दहशत असे प्रकार सुरू आहेत. २०२१ पासून आज अखेर २ कोटी ५२ लाख ५४ हजारांची वसुली केली असून याबाबत करवीर पोलिस ठाण्यात ३ महिलांसह ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल आहे.
आणखी एका प्रकरणात सोनगे (ता. कागल) येथील श्रीधर दत्तात्रय डावरे (वय ४८) यांनी सावकारांच्या छळाला कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी बानगे, (ता. कागल) येथील सावकाराविरूध्द मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सावकाराच्या दहशतीमुळे एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होऊनही प्रशासन यंत्रणा सुस्त आहे. शहरासह ग्रामीण भागातील बोकाळलेली सावकारशाही मोडीत काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
इचलकरंजी परिसरातील कोरोची (ता. हातकणंगले) येथील बांधकाम व्यावसायिक इसराईल विलास गायकवाड (वय ३८) यांनीही खासगी सावकाराच्या दहशतीला कंटाळून दि. २८ सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. शहापूर पोलिस ठाण्यात सावकाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेपूर्वी सावकारी उलाढालीतून इचलकरंजीतील सराफ व्यावसायिकास जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणीही एका माजी नगरसेवकासह तीन साथीदारांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सावकारी टोळ्याविरुध्द प्रभावी मात्रा लागू करण्याची गरज
फोफावणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी एकीकडे प्रतिबंधात्मक कारवाईचा धडका सुरू असतानाच दुसरीकडे गोरगरिबांसह कष्टकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सावकारी टोळ्यांची शहरासह जिल्ह्यात दहशत वाढू लागली आहे. दसरा, दिवाळीच्या तोंडावर सावकारी टोळ्यांचे कारनामे दिसून येतील, त्यापूर्वीच पोलिस यंत्रणेने सावकारी टोळ्याविरुध्द प्रभावी मात्रा लागू करण्याची आवश्यकता असल्याचा सार्वत्रिक सूर आहे.