डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा दोन बलाढ्य आघाड्यांमध्ये होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे; मात्र महायुतीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटलेला नाही. जागावाटपाचा पेच आणि ‘इनकमिंग’ करताना दिलेल्या कमिटमेंटमुळे नेत्यांची खरी कसोटी लागत आहे. काही प्रभागात एकाच कुटंबातील दोघांनी उमेदवारीसाठी हट्ट धरला आहे; पण महायुतीचे उमेदवारी जाहीर करण्यात हाच खरा अडथळा ठरत आहे.
महायुतीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष आहेत. जागावाटपासाठी आतापर्यंत नेतेमंडळींच्या बैठकींच्या दोन फेर्या झाल्या असल्या, तरी अंतिम तोडगा निघालेला नाही. भाजप आणि शिवसेना यांना प्रत्येकी 35 जागांची अपेक्षा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे संकेत दिले जात असले, तरी राष्ट्रवादीने तब्बल 25 जागांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे ‘महायुती होणार’ असे जाहीरपणे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून महायुती अडकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
2015 च्या महापालिका निवडणुकीचा अनुभव आजही सर्वांच्या लक्षात आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही कोल्हापुरात भाजप आणि ताराराणी आघाडी यांच्यात युती झाली होती. त्या निवडणुकीत भाजपला अवघ्या 13, तर ताराराणी आघाडीला 19 जागा मिळाल्या. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील मोठे वजन असूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. युती न झाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा देत भाजपला धक्का दिला होता.
याच पार्श्वभूमीवर 2025 ची निवडणूक महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून, कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही महायुतीच्या झेंड्याखाली लढण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आदी नेत्यांमध्ये चर्चा आणि बैठका झाल्या; मात्र या बैठकीतूनही जागावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.
अलीकडेच एका कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर यांनी एकत्र येत महायुती होणारच, असे स्पष्ट केले, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने महायुतीची उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया थांबली आहे. जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आजही कायम असून, तो लवकर सुटतो की निवडणुकीआधीच महायुतीला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कमिटमेंट पूर्ततेसाठी नेत्यांची कसोटी
तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ झाले आहे. माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांना उमेदवारीची दिलेली आश्वासने पाळण्याची जबाबदारी आता पक्षनेतृत्वावर येऊन ठेपली आहे. मात्र, महायुतीचे समीकरण सांभाळत ही कमिटमेंट पूर्ण करणे अनेक नेत्यांसाठी जोखमीचे ठरत आहे.