कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय हालचाली आता वेगवान झाल्या आहेत. मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे शेजारच्या मतदासंघात इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुरक्षित मतदार संघाचा शोध सुरू केला असल्याचे समजते. यामध्ये उचगाव किंवा गोकुळ शिरगाव या मतदारसंघांत त्यांच्या नावाची चर्चा आहे. यावेळी 20 मतदारसंघ सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित राहिल्यामुळे टोकाची ईर्षा पाहावयास मिळणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे या मतदारसंघातील लढतीदेखील चुरशीच्या होणार आहेत. अनेक माजी सदस्यांनी आपल्या पत्नीला, मुलीला किंवा सुनेला निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांच्या मुलांचे लाँचिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या निवडणुकीतही काही नेत्यांचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे.
मतदारसंघ आरक्षण निश्चित झाल्यानंतर नेत्यांनीही आपली यंत्रणा गतिमान केली आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी नेत्यांच्या दारात हजेरी लावत आहेत. आरक्षणामुळे काही मतदारसंघांत माजी सदस्यांमध्ये लढती पाहावयास मिळतील, तर काही ठिकाणी माजी पदाधिकार्यांमध्येही लढत होण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघांतील लढती प्रतिष्ठेच्या होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी मतदारांपर्यंत आपले नाव पोहोचविण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी दिवाळी भेट पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकाचौकांत झळकू लागले फलक
इच्छुकांचे नेत्यांच्या फोटोसह दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक गावातील चौकाचौकांमध्ये झळकू लागले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील चौक रंगीबेरंगी दिसू लागले आहेत. काही इच्छुकांनी मात्र फलक लावताना खबरदारी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळतात. काही इच्छुकांनी पक्ष, नेता यांना टाळत केवळ आपल्या फोटोचे बॅनर लावल्याचे पाहावयास मिळते, तर काही फलकांवर गावातील राजकारणात सक्रिय असणार्यांच्या छबी पाहायाला मिळत आहेत.