कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टीम यंत्रणेचा वापर न करण्याच्या पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली. पोलिसांनी शिरोली पुलाची येथील दहा मंडळांवर, उचगाव येथील चार मंडळांवर तर निळपण येथे तीन मंडळांवर कारवाई करून साऊंड सिस्टीम जप्त केली.
शिरोली पुलाची : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टीम यंत्रणेचा वापर न करण्याच्या पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी वादातील शिवा फाऊंडेशन या मंडळाबरोबरच दहा गणेशोत्सव मंडळांवर कारवाई केली. या मंडळांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ (ब) अन्वये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, ट्रॅक्टर, ट्रॉली व साऊंड सिस्टीम पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनावेळी साऊंड सिस्टीम यंत्रणेचा तसेच मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणेचा वापर करू नये, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या होत्या. तरीही शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी शिरोली पुलाची गावातील नवीन वसाहत, यादववाडी भागातील काही मंडळांनी आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी शिरोली पोलिसांनी दहा गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये शिवा फाऊंडेशन या मंडळाचा गणपती साऊंड सिस्टीमच्या तालावर गावात दहाच्या दरम्यान निघाला असता कालिका ज्वेलर्सनजीक साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार ठेवण्याची सूचना केली होती. दरम्यान, होमगार्ड तेलवेकर हे सूचना करत असताना त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यावेळी शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्यावरून पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यातून गायकवाड व खवरे यांच्यात तू तू-मैं मैं होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. त्यातून काहींनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला. त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली; परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांवर रविवारी गुन्हे दाखल झाले. यामध्ये शिवा फाऊंडेशनबरोबरच संत रोहिदास तरुण मंडळ, युवागिरी तालीम मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ, रणझुंजार तरुण मंडळ, जय भवानी तालीम मंडळ, मरगाई तालीम मंडळ, छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ, त्रिमूर्ती तरुण मंडळ व चेतक क्रीडा मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल केले. सहा. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक अमित पांडे, प्रमोद चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
निळपणमध्ये तीन मंडळांवर खटले
गारगोटी : निळपण (ता. भुदरगड) येथे गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान मंडळांमध्ये साऊंड सिस्टीमच्या आवाजाबाबत स्पर्धा केल्याच्या कारणावरून तीन गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली. साऊंड सिस्टीम मालक, वाहन मालक तसेच संबंधित मंडळांच्या अध्यक्षांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.
निळपण येथील जय वीर हनुमान तालीम मंडळ, क्रांती स्पोर्टस् आणि न्यू गणेश तरुण मंडळ या तीन मंडळांवर ही कारवाई करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासनाने मंडळांना सूचना दिल्या होत्या. मात्र, साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली.
दरम्यान, गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित साऊंड सिस्टीम जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा भुदरगड पोलिसांनी सर्व गणेश मंडळांना दिला आहे.
उचगावमध्ये चार मंडळांची साऊंड सिस्टीम जप्त
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल चार मंडळांची साऊंड सिस्टीम गांधीनगर पोलिसांनी जप्त केली. मंगोबा तालीम मंडळ, जय शिवराय तालीम मंडळ, दोस्ती ग्रुप, आणि सत्या ग्रुप या चार मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गांधीनगर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर, साऊंड सिस्टीम जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलिसांनी केली.