अक्षय जाधव, अर्चित मकोटे, संकेत देवर्डेकर, ऋतुराज मेथे बनले फौजदार. Pudhari File Photo
कोल्हापूर

अक्षय जाधव, अर्चित मकोटे, संकेत देवर्डेकर, ऋतुराज मेथे बनले फौजदार

पोलिस उपनिरीक्षक परीक्षा 2023 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत कसबा बावडा येथील अक्षय जाधव, इचलकरंजी येथील अर्चित मकोटे व संजय रायमाने, गगनबावडा येथील आनंदा इंजर व राधानगरी येथील संकेत देवर्डेकर यांनी यश संपादन केले. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे ऋतुराज मेथे-पाटील, सुशांत चिंदगे यशस्वी ठरले आहेत. हे सर्वजण आता परीक्षेत बाजी मारून ‘फौजदार’ बनले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ सेवा मुख्य परीक्षा 2023 पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. सुमारे 374 जागांसाठी जाहिरात काढाली होती. त्यानुसार 218 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे. कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील अक्षय शशिकांत जाधव यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातून बीएस्सी. ची पदवी घेतली. आई-वडील तासगाव, जिल्हा सांगली येथे शेतीची कामे करतात. बावड्यात ते चुलते यांच्याकडे शिकायला होते. तेथेचे स्वतंत्र खोली घेऊन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली. काही वर्ष स्पर्धा परीक्षेचा पुण्यात राहून अभ्यास केला. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी येथील आर्चित श्रीहरी मकोटे यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असून, त्यांनी 140 रँक मिळवली आहे. विशेष मागास प्रवर्गात ते अव्वल ठरले आहेत. आर्चित यांचे वडील खासगी व्यावसायिक आहेत. त्यांनी शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव येथून बी.टेक पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यापूर्वी त्यांची लिपीक, टंकलेखक, कर सहायक पदावर निवड झाली आहे. दुसर्‍या प्रयत्नात ते पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. पुढील पदाची परीक्षा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

ऋतुराज रघुनाथ मेथे-पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून 65 वी रँक मिळवली. ते मूळचे अंबप पाडळी (ता. हातकणंगले) येथील आहेत. वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. 2023 मध्ये पीएसआयची परीक्षा दिली. त्यानंतर 2024 मध्ये आयआयएम बौधगया येथे 2024 पासून एमबीए करीत आहेत. आता परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यश मिळाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले पैकी पडवळवाडी येथील प्रशांत आनंदा इंजर यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. प्रशांत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहेत. असळज येथील उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. विज्ञान शाखेतून कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. गगनबावड्यातील आनंदी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. परीक्षेची तयारी करताना आई-वडिलांची प्रेरणा व मित्रांचे खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तुरंबे (ता. राधानगरी) येथील संकेत संजय देवर्डेकर यांची पीएसआय पदी निवड झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री मारुतीराव वारके आबाजी विद्यालयात झाले. सोळांकुर येथील यशवंतराव पाटील महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी घेतली. त्यानंतर पुणे येथून परीक्षेची तयारी केली. पीएसआय म्हणून झालेल्या निवडीचा समाजाच्या हितासाठी उपयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय रायमाने हे इचलकरंजी येथील आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर आजी-आजोबा व मामांनी त्यांचा सांभाळ केला. व्यंकटेश्वरा महाविद्यालयातून बी.कॉम. पूर्ण केले. त्यानंतर संजय घोडावत विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. गेली अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. त्यांना तिसर्‍या प्रयत्नात यश मिळालेे. राज्यसेवा परीक्षा देऊन मोठे पद मिळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT