कोल्हापूर : बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न होतोय का, याची शंका आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी आरोपींना अटक करावी. पोलिसांनी ठरविले, तर 48 तासांत नव्हे, 24 तासांत आरोपी पकडले जातील, असे प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केले.
ते म्हणाले, पोलिसांनी कार्यक्षमता दाखवावी. सत्ता कुणाची यापेक्षा सिस्टीम काय करते ,हे महत्त्वाचे आहे. गृहखात्याने आरोपी पकडून देणार्याला बक्षीस जाहीर केले. मूळ आरोपी सापडल्याशिवाय घटनेचा उलगडा होणार नाही. पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 22 दिवस होऊनही आरोपी सापडत नाहीत.
ते म्हणाले, मंत्र्यांमध्ये खाते वाटपावरून नाराजी आहे. एका-एका खात्याचे अर्धे-अर्धे खाते केले. मंत्री ऑफिसला गेलेले नाहीत. डीएपी खताच्या तुटवड्यावर कृषी विभागाची भूमिका पुढे येत नाही. सरकार सुरू नाही, अशी स्थिती आहे. पालकमंत्री मिळावा, अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावे लागेल. देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराची चौकशी जिल्हाधिकार्यांनी करावी. निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गाचे रद्द केलेले नोटीफिकेशन येणार असेल, तर ते प्रिपेड मीटरसारखे आहे का? काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने उभा राहील. शेंडा पार्क येथे आयटी पार्कची उभारणी ही महायुतीच्या नेत्यांची जबाबदारी आहे. सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार आहे. पत्रकार बैठकीला आमदार जयंत आसगावकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्थ खात्याने त्या फायलीवर अटी आणि शर्थी घाला, असे लिहिले होते का? मग आता का घालता?, भाऊबीज म्हणून पैसे दिले. मग आता बहिणींमध्ये दुजाभाव का केला जातोय? कोणाचेही नाव कमी करू नका, असेही आ. सतेज पाटील म्हणाले.
आ. पाटील म्हणाले, साखरेची एमएसपी वाढत नाही तोपर्यंत शेतकर्यांना चार पैसे जादा द्यायला परवडणार नाहीत. कारखान्यांना क्लोज लोन शुन्य टक्के दराने एनसीडीकडून द्यावे. सरकारला साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत.