कोल्हापूर : एक कोटीच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, अमानुष मारहाण आणि खोलीत कोंडून दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी जेरबंद केलेल्या कुख्यात गुंड, म्होरक्या अजित भगवान तिवडे (रा. रुईकर कॉलनी) याच्यासह चार साथीदारांना रविवारी रुईकर कॉलनी, कळंबा रिंगरोड परिसरातील बांधकाम साईडवर फिरविण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली आलिशान मोटारही हस्तगत करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक नीलेश सुरेश जाधव (रा. कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून रुईकर कॉलनीतील अजित ट्रेडर्समध्ये त्यांना कोंडून घालून मारहाण केली होती. राजवाडा पोलिसांनी म्होरक्या अजित तिवडेसह साथीदार श्रीधर ऊर्फ लखन माने, फैयाज नगारजी, संजय किरणजी (मायाभाई) याच्या मुसक्या आवळल्या. टोळीतील फरार साथीदार, चालक लालाशेट ऊर्फ स्वप्निल जाधव (वय २८, रा. पाचगाव, ता. करवीर) हा पसार आहे. पोलिस निरीक्षक किरण लोंढेसह पथकाने संशयिताना रूईकर कॉलनी व कळंबा रिंगरोडवरील बांधकाम साईडवर फिरविले. म्होरक्या तिवडे, टिपर फैयाज नगारजीवर अधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. टोळीत चौघांशिवाय आणखी दोघांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा संशय आहे. संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. तपासासाठी कोठडीच्या मुदतवाढीची मागणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
टोळीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव
कोल्हापूर : खुनासह १७ गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या अन् व्यावसायिकावर खुनी हल्ला करून खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या कुख्यात ‘साई भाई’ टोळीचा म्होरक्या गेंड्या ऊर्फ ऋषीकेश बाबासाहेब चौगुले (वय २७, रा. नवशा मारुती मंदिर, चौदावी गल्ली, राजारामपुरी) याला पोलिसांनी रविवारी सायंकाळी राजारामपुरीसह परिसरातून फिरविले.